
‘राधाकृष्ण विखे-पाटील ज्या पक्षात जातात, त्याच पक्षाविरोधामध्ये काम करतात, याचा प्रत्यय आज पाहायला आणि अनुभवायला मिळाला,’ असा आरोप भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केला. जामखेड बाजार समितीची निवडणूक आज पार पडली. त्यानंतर राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विखे यांच्यावर आरोप केले.
जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी मिळाली. दोघांचेही समान उमेदवार निवडून आले. त्यामुळे ‘ईश्वरी चिठ्ठी’ने अध्यक्षपद कोणाला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे होते, असे राम शिंदे यांनी सांगितले. वास्तविक आमच्याकडचे जे उमेदवार होते, ते विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून उभे केले आणि त्यांना तिकडून निवडून आणले. विशेष म्हणजे, ज्यावेळी सभापतींची निवडणूक लागली, त्यावेळी ते उमेदवार आमच्याकडे येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. उलट त्यांनी आमच्याविरोधात जाऊन अर्ज भरून निवडणूक लढविली. देशात, राज्यात आमची सत्ता आहे. विखे आमचे मंत्री आहेत. सुजय विखे आमच्या पक्षाचे खासदार आहेत. एवढे असूनदेखील त्यांनी कोणतीही मदत केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. उलट त्यांनी एक प्रकारे आमदार रोहित पवार यांच्याबरोबर छुपी युती केल्याची शंका आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला.
View this post on Instagram
राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनेलच्या विरोधात उमेदवारी दिल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली. याबाबत पक्षश्रेष्ठाRना अहवाल सादर करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विखे ज्या पक्षात जातात, त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात, हे यापूर्वी ऐकले होते, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, असे शिंदे म्हणाले. एक प्रकारे विखे आणि पवार यांची युती अतूट आहे, याचा प्रत्यय आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, शिंदे यांच्या आरोपांनंतर नगरमध्ये बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, राम शिंदे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी गैरसमजुतीमुळे आरोप केले आहेत. वास्तविक त्यांनी आरोप करण्यापूर्वी आपल्याशी चर्चा करायला हवी होती.
जामखेडमध्ये सभापतींवर ‘ईश्वरी चिठ्ठी’ची कृपा!
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीवेळी ‘ईश्वरी चिठ्ठी’ टाकून कौल घेण्यात आला. येथे भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान मते मिळाली आहेत. ईश्वरी चिठ्ठीत सभापतिपदी भाजपचे शरद कार्ले, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास वराट यांची निवड झाली. भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटांमध्ये सत्तावाटप झाले. जामखेड बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक झाली. यात भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या होत्या.




























































