
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सोमवारी सायंकाळी धमकीचा फोन आला. गडकरी यांच्या दिल्ली कार्यालयाने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी एक फोन आला. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तो उचलला. त्यावेळी समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपल्याला केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं असल्याचं सांगितलं. यावर कर्मचाऱ्यांनी गडकरी कामात व्यस्त असल्याने ते फोनवर बोलू शकत नसल्याचं सांगितलं. यावर त्या व्यक्तीने गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली. या आधी दोन वेळा गडकरी यांना धमकीचे फोन आले होते. त्याचा तपास सुरू असतानाच त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


























































