
केवायसी अपडेटच्या नावाखाली तरुणीची फसवणूक करणाऱ्या जामतारा गँगला नागपाडा पोलिसांनी गजाआड केले. मुनजिर अन्सारी, अली अन्सारी आणि जहांगीर अन्सारी अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही नागपाडा येथे राहते. फेब्रुवारी महिन्यात तिला मोबाईलवर एकाचा फोन आला. त्याने त्याचे नाव सांगितले. आपण बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे का, असे विचारले. क्रेडिट कार्डचे केवायसी ऑफलाइन पद्धतीने अपडेट करावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर तरुणीने तो फोन केला. फोन कट केल्यावर तरुणीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज उघडल्यानंतर तिच्या खात्यातून पैसे गेले. ठगाने तरुणीच्या खात्यातून 65 हजार रुपये काढले. पैसे गेल्याचे लक्षात येताच तरुणीने नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या पथकातील उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेंडगे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक झारखंड येथील देवघर या ठिकाणी गेले. पोलीस पंचमुखी गावात गेले, तेव्हा काही जण मोबाईलवर बोलत होते. पोलीस असल्याचे पाहून काही जण पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्या तिघांकडून 9 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याना ट्रांझिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले.





























































