
राज्यातील विविध कारागृहांत बंदिवान असलेल्या परदेशी कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत सुसंवाद साधता यावा यासाठी ई-प्रीजन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याशिवाय आर्थिक परिस्थितीमुळे घरी न जाणाऱ्या विविध जिह्यांतील गरीब कैद्यांनाही व्हिडीओ कॉलद्वारे नातलगांसोबत गप्पा मारता येणार आहेत. त्या अनुषंगाने ऑनलाइनरीत्या संबंधितांची नोंदणी करून ई-मुलाखतला सुरुवात केली जाणार आहे.
परदेशी कैद्यांचा नातेवाईकांसोबत संवाद घडावा यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार ई-प्रीझन प्रणालीअंतर्गत ई-मुलाखत विभागात संबंधित नातलगांकडून व्हिडीओ कॉलिंगसाठी वेळ निश्चित केली जात आहे. त्यासाठी नातलगांची संपूर्ण माहिती मुलाखत विभागात समाविष्ट करावी लागणार आहे. ई- मुलाखत आवश्यक असलेल्या कैद्यांची माहिती नातलगांनी सबमिट केल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्याच्या माहितीची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित कैद्यांच्या नातलगांना लिंक पाठवून व्हिडीओ कॉलिंग सुसंवाद घडविला जाणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कारागृहात असलेल्या कच्च्या आणि पक्क्या 645 परदेशी कैद्यांसह आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या कैद्यांचा नातलगांसोबत थेट संपर्क होण्यास मदत होणार आहे.
येरवडा कारागृहात स्मार्टकार्ड योजना
येरवडा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी प्रायोजिक तत्त्वावर स्मार्टकार्ड योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार संबंधित कैद्याने रजिस्टर केलेल्या माहितीनुसार स्मार्टकार्ड फोनद्वारे नातलगांसोबत संवाद साधता येणार आहे.
राज्यभरातील विविध कारागृहात असलेल्या परदेशी आणि देशांतर्गत गरीब कैद्यांचा नातलगांसोबत ई-मुलाखतीद्वारे संवाद घडविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार ई-प्रीझनअंतर्गत मुलाखतीची वेळ निश्चित केल्यानंतर व्हिडीओ कॉलिंगद्वारे सुसंवाद घडविला जाणार आहे. त्यामुळे बंदिवानांमधील नैराश्य दूर होण्यास मदत होईल.
– अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह



























































