
ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘आरआरआर’ (RRR movie) या चित्रपटातील अभिनेते रे स्टीव्हन्सन (Ray Stevenson) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. इटलीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा कोसळली आहे.
‘आरआरआर’ चित्रपटाच्या टीमने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रे स्टीव्हन्सन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘रे स्टीव्हन्सन यांच्या निधनाचे वृत्त आरआरआरच्या टीमसाठी धक्कादायक आहे. तुम्ही कायम आमच्या हृदयात राहाल, सर स्कॉट. भावपूर्ण श्रद्धांजली’, असे ट्विट आरआरआरच्या टीमने केले आहे.
What shocking news for all of us on the team! 💔
Rest in peace, Ray Stevenson.
You will stay in our hearts forever, SIR SCOTT. pic.twitter.com/YRlB6iYLFi
— RRR Movie (@RRRMovie) May 22, 2023
एसएस राजमौली यांच्या सुपरडुपर हिट ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये रे स्टीव्हन्सन यांनी निगेटीव्ह भूमिका साकारली होती. राम चरण आणि ज्युनियर एनटीआरनंतर सर्वात जास्त भाव रे स्टीव्हन्सन यांनी साकारलेल्या ब्रिटीश गव्हर्नरच्या भूमिकेने खाल्ला होता.
‘आरआरआर’ या चित्रपटासह रे स्टीव्हन्सन यांनी मार्व्हल सीरिजच्या ‘थॉर’मध्ये व्होल्स्टॅग आणि ‘वायकिंग्स’मध्ये ओथेरची भूमिका साकारली होती. तसेच एनिमेटेड स्टार वॉर्स सीरिजमधील ‘द क्लोन वॉर्स’ आणि ‘रिबेल्स’मध्ये गार सेक्सनला आवाजही दिला होता. तसेच डिज्नी प्लसच्या आगामी ‘द मंडलोरियन’ आणि ‘अशोका’ साठीही त्यांची तयारी सुरू होती. मात्र यादरम्यान त्यांचे निधन झाले.
अमेरिकेतील एका आउटलेटच्या वृत्तानुसार, रे स्टीव्हन्सन यांचा जन्म 25 मे, 1964 रोजी लिस्बर्न शहरामध्ये झाला होता. ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर 90च्या दशकामध्ये छोट्या पडद्यावरील मालिका आणि टेलिफिल्मपासून त्यांनी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1998मध्ये आलेल्या ‘द थ्योरी ऑफ फ्लाईट’ या चित्रपटाद्वारे ते पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले. यासह ‘किंग आर्थर’ (2004), ‘पनिशर: वॉर जोन’ (2008), ‘द बुक ऑफ एली’ (2010) आणि ‘द अदर गाइज’ (2010) या चित्रपटामध्येही त्यांची भूमिका होती.



























































