
शुक्रवारी मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला. तेव्हापासून मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला असून, त्याचा वेगही मंदावला आहे. महाराष्ट्रात विदर्भासह अनेक ठिकाणी पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटात पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने यंदा मान्सून अंदमानात वेळेवर येणार असल्याचे भाकित केले होते. 19 मे रोजी मान्सून अंदमानच्या इंदिरा पॉइंट अर्थात नानकोव्हरी बेटांवर पोहचला. तेव्हापासून मान्सून या बेटावरच रमला आहे. सामान्यत: 21 मेपर्यंत मान्सून पोर्टब्लेअरला दाखल होतो. परंतु, सोमवारपर्यंत नानकोव्हरी बेटांवरूनच मान्सूनचे प्रस्थान झाले नव्हते. मान्सूनचा वेग मंदावला असून दोन दिवसांत तो पुन्हा वेगवान होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मराठवाड्यात प्रचंड उकाडा
महाराष्ट्रात विदर्भासह काही भागांत 24 आणि 25 मे रोजी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आर्द्रतेसह प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ओडिशा, आंध्राच्या किनारपट्टी भागातही उष्णता जाणवेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
उत्तर हिंदुस्थानात पाऊस, राजस्थानात धुळीचे वादळ
सध्या उत्तर हिंदुस्थानला उष्णता भाजून काढत आहे. पुढील चार दिवस जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थानात विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थानात धुळीचे वादळ येण्याचीही शक्यता आहे.



























































