
मतदार नोंदणी करताना ज्या सरकारी छळाला सामोरे जावे लागते त्यापासून लवकरच सुटका होणार आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत आपोआप नाव नोंदवले जाईल, अशी व्यवस्था उभारली जाणार असून याबाबतचे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे.
जन्म आणि मृत्यूच्या नोंदी मतदार यादीशी लिंक केल्या जाणार आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती लगेच निवडणूक आयोगाला मिळेल आणि संबंधित नाव मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. याशिवाय आयोगाकडेही जन्माची नोंद असल्यास कुणाही व्यक्तीने वयाची 18 वर्षे पूर्ण केली की आपोआप त्याचे नाव डिजिटल मतदार यादीत नोंदवले जाईल. नोंदणी करण्यासाठी तसेच ओळखपत्र मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. जनगणना भवनाच्या उद्घाटना वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली.
> जन्म आणि मृत्यूच्या नोंदी मतदार यादीशी लिंक करण्याबाबतचे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
> जनगणनेतील संपूर्ण माहिती अचूक असावी, असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत. हा डेटा अचूक असल्यास त्यातून या आकडेवारीशी संबंधित सर्वच बाबी सोप्या होतील, असे नमूद करण्यात आले आहे.


























































