
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने एक पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
गेल्या काही काळात आशिष देशमुख यांची भाजपशी जवळीक वाढली होती. ते सातत्याने पक्षविरोधी वक्तव्यही करत होते. नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आशिष देशमुख यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काही सूचक विधानही केले होते.
दरम्यान, सातत्याने पक्षविरोधी भूमिकांमुळे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजी आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस दाखवली होती. याला आशिष देशमुख यांना 9 एप्रिल रोजी उत्तर दिले होते. मात्र या उत्तरामुळे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे समाधान झाले नाही.
पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल आशिष देशमुख यांनी दिलेले उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीला समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात असे म्हणत आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. @INCMaharashtra @INCIndia @NANA_PATOLE pic.twitter.com/nBtz48KXIw
— Shreenivas Bikkad (@shreebikkad) May 24, 2023

































































