
आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात खेळवायची की नाही? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिल्याने यावर तोडगा म्हणून पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव दिला होता, पण बीसीसीआयने या प्रस्तावालाही नकार दर्शविल्याचे कळले आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) आता पाकिस्तानला धक्का देण्याची तयारी केली असून पाकिस्तानशिवाय आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी आशिया चषक पाकऐवजी श्रीलंकेत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एसीसीने आता पाकिस्तानशिवाय आशिया कप नियोजन सुरू केले आहे. इतर संघदेखील पाकिस्तानशिवाय आशिया चषक स्पर्धा खेळण्यास तयार असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानला जर आशिया कपमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांना श्रीलंकेत खेळावे लागेल, असे एसीसीने बजावले आहे.
विश्वचषकाबाबत पीसीबीची नरमाईची भूमिका
आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थान सहभागी झाला नाही तर पाकिस्तान आगामी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची धमकी पीसीबीकडून देण्यात येत आहे. मात्र पाकिस्तानने असे पाऊल उचलले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आयसीसी अध्यक्षांनी पीसीबीला दिला आहे. त्यामुळे पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी विश्वचषक खेळण्याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. पीसीबीने हा सर्व मुद्दा पाकिस्तान सरकारवर सोडून दिला आहे. पाकिस्तान सरकार जर परवानगी देत असेल तर त्यांचा संघ हिंदुस्थानात जाऊन विश्वचषक खेळेल, असे सेठी यांनी सांगितले.






























































