मना घडवी संस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरगाव परिसरातील ज्ञानदानाचे पवित्र संस्कार करणाऱ्या ज्या वास्तू आहेत, त्या अनेक वास्तूंना शंभर वर्षांची परंपरा आहे. अशीच एक प्रसिद्ध शाळा म्हणजे सव्वाशे वर्षे पूर्ण करणारी आर्यन हायस्कूल.

19 फेब्रुवारी 1897 या दिवशी आर्यन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि त्या संस्थेचीच आर्यन हायस्कूल ही शाळा. गिरगावात ऑपेरा हाऊसवरून पाच मिनिटांच्या अंतरावर ही दगडी वास्तू आजही दिमाखात पाय रोवून ठामपणे उभी आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हे ब्रीदवाक्य शाळेने घेतले आहे. मुख्य म्हणजे मराठी माध्यमाची शाळा आजही टिकून आहे हे महत्त्वाचे.

आर्यन शाळेची काही वैशिष्टय़े सांगायची म्हटली तर भगवद्गीतेचे वर्ग इथे दर शनिवारी घेतले जातात. तसेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव इथे आजही साजरा होतो. त्या वेळी दही- पोहे करून प्रसाद म्हणून वाटले जातात. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीला शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून  पुष्पहार अर्पण करतात.

आर्यन शाळेत पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागांत दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. तसेच याच वास्तूत अध्यापिका विद्यालय अर्थात मुलींसाठी डीएड कॉलेज ‘वनिता विनयालय’ नावाने चालवले जाते. इथे उद्याचे शिक्षक घडवले जातात. आर्यन शाळेत पूर्की क्यायामशाळादेखील होती. 19 फेब्रुकारी हा शाळेचा कर्धापनदिन मोठय़ा प्रमाणाकर साजरा होतो. गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येते.

शाळेच्या उपक्रमासंदर्भात शाळेचे सीईओ अविनाश म्हात्रे म्हणतात, ‘‘गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील मराठी माणसांची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी आमची शाळा कायम कार्यरत असते.  ज्या उद्देशाने ही शाळा स्थापन झाली, ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत असते. ’’

आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या गिरगावात दोन शाखा आहेत. त्यापैकी दुसरी शाखा म्हणजे मुलींसाठी कार्यरत असणारी ‘शारदा सदन शाळा.’ संस्थेची सर्वात मोठी शाळा पालघर येथे असून ‘म. नी. दांडेकर स्कूल’ या नावाने ती शाळा कार्यरत आहे.

सव्वाशे वर्षांचा प्रवास

1897 ते 2023 असा शाळेचा एकशे पंचवीस वर्षांचा प्रवास आपणास थक्क करणारा निश्चित आहे. काळानुरूप शाळेत जे बदल झाले, त्यानुसार अत्याधुनिक अशी कॉम्प्युटर लॅब इथे सुरू करण्यात आली आहे. इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन येथे सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग पण चालवले जातात. प्रशस्त असे वाचनालयदेखील येथे असून शाळेचे सभागृह आता वातानुकूलित करण्यात आले आहे.  शाळेने न्यायमूर्ती रानडे, सी. डी. देशमुख, सुधीर फडके, स्वामी स्वरूपानंद यांच्यापासून ते अरुण द्रविड, जयंत सावरकर, भरत दाभोळकर, उषा नाडकर्णी, अश्विन बापट अशी विविध क्षेत्रांतील रत्ने घडवली आहेत.

>> गणेश आचवल