शिंदे गट भाजपाच्या ताटाखालील मांजर, दिपक केसरकर भाजपसमोर नमले! वैभव नाईक यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासन आपल्या दारी हा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील कार्यक्रम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिसकावून कुडाळ येथे आणला आहे. त्यामुळे स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे मंत्री दीपक केसरकर स्वतःचे मंत्रीपद टिकविण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांसमोर नमले आहेत. शिंदे गट हा भाजपच्या ताटाखालचेच मांजर बनले आहे. त्यामुळे शिवसेनेत बंड करून शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांना आगामी निवडणुकीत भाजपचेच पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

कुडाळ दौर्‍यावर आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी येथील शिवसेना शाखेत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आजपर्यंत शिंदे गटातील आमदार व मंत्र्यांच्या मतदारसंघात घेतला जात होता. सावंतवाडीतही मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केसरकर यांनीही आपल्या मतदारसंघातील कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र केसरकर यांचा कार्यक्रम भाजपने हिसकावून घेतला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोनदा पराभव झालेल्या आपल्या मुलाला आगामी निवडणुकीत पुढे आणण्यासाठी हा कार्यक्रम कुडाळ येथे घेतला आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण शिंदे गटात गेल्याचे सांगणारे केसरकर आता जनतेला काय उत्तर देणार? त्यांचा स्वाभिमान आता गेला कुठे?, असा सवाल वैभव नाईक यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुडाळ येथे येत आहेत, आमची कोणतीही हरकत नाही. परंतु केसरकर स्वतःचे मंत्रीपद टिकविण्यासाठी आता भाजपाशी जुळवून घेत आहेत. राणेंसमोर केसरकर यांची डाळ शिजली नाही. आगामी निवडणुकांमध्येही तिकिट देताना शिंदे गटात गेलेल्या गद्दार आमदार-खासदार यांची भाजपासमोर डाळ शिजणार नाही. त्यावेळी त्यांना आपण केलेले बंड स्वतःच्या स्वार्थासाठी होते, मंत्रीपदासाठी होते की सर्वसामान्य जनतेसाठी होते, हे दिसून येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक प्रश्न आहेत, केसरकर ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या शिक्षण खात्यात 50 टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील 131 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हा शासकीय कार्यक्रम असला तरी, सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात कोणतेही ठोस विकासकामे केलेले नाही. उलट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांना स्थगिती दिली आहे, असा आरोप नाईक यांनी केला.

नाईक म्हणाले, माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात मी सातत्याने असतो. येथील जनता कायमच माझ्या पाठीशी आहे, त्यामुळेच सत्ताधारी तीन तीन मंत्री माझ्या मतदारसंघात उतरले आहेत. केंद्रीय मंत्री राणे, शिक्षण मंत्री केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंत्रीपदासाठी पक्षाशी व जनतेशी बेईमानी केली आहे. मंत्रीपद मिळण्यासाठी त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. त्यामुळे ते माझ्याविरोधात एकत्र जरी आले तरी जनता त्यांना निश्चितच धुडकावून लावेल. कोकणातील जनता स्वाभिमानी आहे. या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता नेहमीच निष्ठावंतांच्या पाठिशी उभी राहीली आहे. येथील जनता माझ्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सदैव पाठीशी उभी राहील, असा विश्वास आ.वैभव नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.