नारायण राणे यांची सभा उधळल्याचे प्रकरण : तब्बल 18 वर्षांनंतर 38 जणांवर आरोप निश्चित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या नारायण राणे यांची सभा उधळून लावल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने अखेर 18 वर्षांनंतर 38 जणांविरोधात आरोप निश्चित केले. आरोपींमध्ये तीन खासदारांसह चार आमदारांचा समावेश आहे. सत्र न्यायाधीश राहुल राकडे यांच्यापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयात हजर राहिलेल्या 38 जणांवर आरोप निश्चित करतानाच गैरहजर राहिलेले संजय बावके, रवींद्र चव्हाण आणि हरिश्चंद्र सोलकर या तिघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले, तर रुग्णालयात दाखल असलेले श्रीधर सावंत यांना कोर्टरूममध्ये हजर राहण्यास न्यायालयाने मुदत दिली.

शिवसेनेतून 2005 मध्ये हकालपट्टी झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. पक्षाशी गद्दारी केलेल्या राणे यांच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी राणेंची सभा उधळून लावली होती.

आरोपींकडून सर्व आरोपांचे खंडन
न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दोषारोप वाचन केले. 38 आरोपींवर भादंवि कलम 141, 143, 145, 147, 149, 319, 353 यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार आरोप निश्चित करण्यात आले. यावेळी उपस्थित आरोपींकडून सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील तीन आरोपी कोण आहेत, हे कोणालाच माहित नसल्याची बाब न्यायालयात उघड झाली. याप्रकरणी 21 जूनला खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे.