
गोरेगाव परिसरात दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या तिघांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. लखन सोनावणे, राहुल सोनावणे आणि गणेश साठे अशी त्यांची नावे आहेत. भगतसिंग नगर येथे काही जण दरोडय़ाच्या तयारीत असल्याची माहिती बांगूर नगर पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक ज्योती भोपळे, सहाय्यक निरीक्षक संजय सरोळकर आदी पथकाने तपास सुरू केला. आज पहाटे पोलिसांनी नया नगर येथील खाडीजवळ सापळा रचला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकू, दरोडा टाकल्यावर वेगवेगळ्या रस्त्याने पळून जायचे, अशी ते चर्चा करत होते. पोलिसांनी सापळा रचून लखन, राहुल आणि गणेशला ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेऊन दोन जण पळून गेले. त्या तिघांकडून दरोडय़ाचे साहित्य जप्त केले. पळून गेलेल्या त्या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.






















































