
औरंगजेब संदर्भात मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याचे संतप्त पडसाद बुधवारीही कोल्हापूर शहरात उमटले. मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक दिल्यानंतर बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व संघटना एकत्र आल्या. काही कार्यकर्ते थेट घोषणा देत समोरील गल्लीत घुसल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यासंदर्भात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना सरकारच्या इच्छाशक्तीला लक्ष्य केलं. तसं पोलिसांना मोकळीक दिली तर ते अशा परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळतात अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
कोल्हापूरमध्ये कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या. त्याच्याआधी देखील वेगवेगळ्या भागात नगर किंवा इतर शहरांमध्ये दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार हे होताहेत त्याच्यातून कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहेत, असं अजित पवार म्हणाले.
‘मला एक कळत नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तसेच पोलीस खाते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की, यामध्ये नक्की काय होत आहे? याच्या पाठीमागे कोण आहे? की येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अडचणीत आणून कुठे समाजात अंतर पाडण्याचं काम, तेढ निर्माण करण्याचं काम किंवा द्वेष निर्माण करण्याचं काम असं काही जाणीवपूर्वक करताहेत का? आणि त्यांना त्याच्यातून काही स्वार्थ साधायचा आहे का? अशा प्रकारची चर्चा दबक्या आवाजात होत आहे आणि म्हणून या अलिकडच्या काळात ज्या घटना घडल्या आहेत त्यात खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल, व्हॉट्सअॅपवरील बातम्या हे सगळं आलेलं आहे. हे सगळं तपासता येतं. पण त्यात मजबूतीनं या गोष्टीचा छडा आम्हाला लागलाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारमधल्या राज्यकर्त्यांची पण असली पाहिजे आणि पोलीस खात्याच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील असली पाहिजे’, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
‘कोल्हापूर बंद करणार असं पोलिसांना काही गटांनी कळवलं होतं. तेव्हा शांतता समित्या, सामाजिक संस्था आणि त्या त्या शहरात कुणाला सोबत घेऊन हे प्रकरण संवेदनशीपणे हाताळता येईल ही सगळी माहिती पोलिसांकडे असते. फक्त त्यामागे राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना स्पष्ट आदेश असला पाहिजे की हे आम्हाला घडू द्यायचं नाही आणि पोलीस अधिकारी म्हणून सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे आणि हे शांतपणे हाताळले गेले पाहिजे. असे निर्देश दिल्यावर पोलीस देखील त्यापद्धतीनं प्रकरण हाताळतात’, असंही ते म्हणाले.
‘आम्ही आमच्या काळात देखील या परिस्थिती हातळल्या आहेत. पोलिसांना योग्य निर्देश दिले तर ते योग्य पावलं उचलून हे प्रकार रोखण्यासाठी सक्षम असल्याचं माझं स्पष्ट मत आहे’, असं त्यांनी सांगितलं.
‘कुठल्याही जाती-धर्म-पंथ यात कुणी सांगितलेलं नाही की एकमेकांचा द्वेष करा. मात्र एकाबाजूला वाढती महागाई आणि बेरोजगारी हे भयंकर प्रश्न आहेत. या सरकारनं नोकऱ्यांचं आश्वासन देऊन सत्ता मिळवली मात्र दिलेली वचनं प्रत्यक्षात कृतीमध्ये आणण्यात आलेल्या नाहीत. तेव्हा जाणीवपूर्वक अशा गोष्टींना कुणी खतपाणी घालत आहे का? याचा मास्टरमाइंड कोण आहे? कोण हे करण्यासाठी प्रोत्साहित करतं आहे? या सगळ्याचा छडा लावण्याचं काम पोलीस खात्यानंही केलं पाहिजे’, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
‘माझं पोलीस खात्यालाही आव्हान आहे की त्यांना वाटतंय की परिस्थिती नियंत्रणात यावी परंतु आताच्या सरकारमधील मान्यवर त्यामध्ये जेवढं मोकळीक द्यायला पाहिजे, राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे, अशा गोष्टीमध्ये काही कमी पडत असेल तर त्या अधिकाऱ्यांची नावं सांगणार नाही पण वस्तूस्थिती मी मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणि राज्याच्या समोर आणण्याचं काम करीन. कारण महाराष्ट्राचं प्रशासन आणि सर्व सरकारी यंत्रणा जर तुम्ही त्यांच्याकडून व्यवस्थित पणे काम करून घ्यायचं ठरवलं, तसेच पारदर्शकपणे त्यांच्या बदल्या योग्य ठिकाणी झाल्या तर या गोष्टी आटोक्यात राहू शकतात ही आजपर्यंतची महाराष्ट्राची परंपरा असल्याचं’ त्यांनी सांगितलं.





























































