
आता वेतनधारक करदात्यांना फॉर्म 16 मिळू लागतील. प्राप्तीकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयटीआर) भरताना पूर्वतयारीची गरज आहे.
कंपन्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 देतात. त्यातून आपल्या वेतनाची माहिती मिळते. याव्यतिरिक्त बँकेतून व्याज प्रमाणपत्र, बचत खात्याच्या व्याजाची नोंद, कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे, गृहकर्ज परतफेडीची व त्यावरील व्याजाची नोंद दर्शवणारे प्रमाणपत्र, मुलांच्या शिक्षणासाठी भरलेल्या फीच्या पावत्या, शेअरवरील लाभांशाची रक्कम अशी अनेक कागदपत्रे आयटीआरसाठी तयार ठेवा.
बँक खाती
करदात्याने सर्व बँक खात्यांची सविस्तर माहिती विवरण पत्रात भरावी. बँक खात्याचे व्याज व इतर उत्पन्नाची माहिती तयार ठेवा. घरातील 18 वर्षांखालील मुलांच्या नावे असलेल्या बँक खात्यातील उत्पन हे पालकांच्या उत्पन्नात मिळवा. मुलांची पासबुक अपडेट करून ठेवा.
विमा पॉलिसी
मुदत पूर्ण झाल्यावर विमा पॉलिसीची रक्कम जर तुम्हाला या आर्थिक वर्षात मिळाली असेल तर ती करमुक्त असते. ही रक्कम प्राप्तीकर विवरण पत्रात योग्य रकान्यात लिहावी लागते. काही विमा पॉलिसीवरील परतावा करपात्र असतो. अशा वेळी विमा कंपनी आधीच कर कापून पैसे देते, हे लक्षात ठेवून माहिती भरा.
गृह खरेदी किंवा विक्री
तुम्ही वर्षभरात घर किंवा स्थावर मालमत्ता विक्री केली असेल तर त्यावरील भांडवली नफा करपात्र असतो. तो वाचवण्यासाठी जर तुम्ही सरकारी कंपन्यांचे बॉण्ड घेतले असेल किंवा दुसरे घर घेतले असेल तर त्याची पूर्ण माहिती विवरण पत्रात द्या.
नोकरी बदल
काही कारणास्तव नोकरी बदलण्याची वेळ येते. वेतनधारकाने नोकरी बदलली असेल तर त्याला दोन्ही कंपन्यांकडून फॉर्म 16 मिळेल. जर दोघांनी करमुक्त उत्पन्न मर्यादेला धरून कर कपात केली असेल तर मात्र करदात्याला एकदाच करमुक्त उत्पन्न मर्यादेचा फायदा घेता येतो. अशावेळी स्वतःला कर भरावा लागतो. त्यादृष्टीने तयारी ठेवा.



























































