पूर्व उपनगरातील पूल होणार मजबूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व उपनगरातील सर्व पूल आता मजबूत होणार आहेत. कारण पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर दुरुस्तीची गरज असलेल्या 15 पुलांचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका सुमारे 42 कोटींचा खर्च करणार आहे. दोन वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात येणार आहे.

अंधेरीतील गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. यामध्ये आता पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.