
सागर, क्रांतिवीर, बॉबी अशा प्रसिद्ध चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. 8 जून रोजी डिंपल आपला 66वा वाढदिवस साजरा करत आहे. डिंपलने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये आणि अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे नाना पाटेकर. क्रांतिवीर या चित्रपटात डिंपल कपाडियांना ‘कलमवाली बाई’ असं म्हणणाऱ्या नानांच्या तोंडचे संवाद त्यावेळी तुफान गाजले होते.
त्याच नाना पाटेकरांविषयी एक धक्कादायक खुलासा डिंपल यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्या एका वेगळ्याच बाजुविषयी खुलासा केला होता. 1991 साली आलेल्या प्रहार या चित्रपटात नानासोबत त्यांनी सर्वप्रथम काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी अंगार आणि क्रांतिवीर हे चित्रपट केले होते. त्यानंतर 2010मध्ये तुम मिलो तो सहीमध्ये त्यांनी पुन्हा एकत्र काम केलं होतं.
त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत डिंपल म्हणाल्या होत्या की, नाना हा खूपच किळसवाणा आहे. चांगल्या आणि वाईट अर्थानेही. त्याच्या अभिनय कौशल्याबाबत बोलायचं झालं तर तो कमालीचा प्रतिभावान अभिनेता आहे. त्याचा अभिनय पाहते तेव्हा त्याला 100 खूनही माफ करेन. तो दयाळू आणि चांगला मित्रही आहे. पण, मी त्याची एक आणखी बाजू पाहिली आहे जी अनेक लोकांपासून लपवून ठेवण्यात आली आहे, असं डिंपल या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.



























































