
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील दुकानदारांच्या 500 चौरस फुटांच्या घरांच्या मागणीबाबत म्हाडाने उच्च न्यायालयातील भूमिकेत ‘यू टर्न’ घेतला आहे. जे दुकानदार घरांचा पर्याय निवडतील त्यांना 500 चौरस फुटांची घरे देण्यास म्हाडाने मागील सुनावणीवेळी तयारी दाखवली होती. मात्र बुधवारी म्हाडाने त्या आधीच्या प्रस्तावाला बगल दिली आणि सर्व दुकानदारांनी घरांचा पर्याय निवडला तरच दुकानदारांना 500 चौरस फुटांची घरे दिली जातील, अशी नवीन भूमिका न्यायालयात मांडली. म्हाडाच्या या भूमिकेने बीडीडी चाळींतील दुकानदारांना मोठा धक्का बसला आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांप्रमाणेच दुकानदारांनाही 500 चौरस फुटांचे घर देण्याची मागणी आहे. यासंदर्भात वरळीतील बीडीडी चाळ संघाच्या वतीने अॅड. प्रथमेश भरगुडे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी म्हाडाने जेवढे दुकानदार 500 चौरस फुटांची घरे स्वीकारण्यास तयार असतील त्यांना पुनर्विकास प्रकल्पातील घरे देण्यास आम्ही तयार आहोत, असा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर खंडपीठानेही म्हाडाच्या प्रस्तावाची पुनर्विकास प्रकल्पातील सर्व दुकानदारांना माहिती देऊन त्यांना घरे हवी असल्यास तसा पर्याय निवडण्यास सांगितले होते. त्याला अनुसरून काही दुकानदारांनी घरांचा, तर काहींनी दुकानांचा पर्याय निवडला. तो मुद्दा बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी उपस्थित केला. यावेळी म्हाडातर्फे अॅड. मिलिंद साठे यांनी बाजू मांडली. सर्व दुकानदार घरांचा पर्याय निवडण्यास तयार असतील तरच घरे देऊ, असे त्यांनी सांगितले. त्यावर अॅड. अंतुरकर यांनी आक्षेप घेतला. मुळात आमचा हा प्रस्ताव नव्हता, तर आम्हाला दुकानांची 160 चौरस फुटांऐवजी वाढीव जागा देणे, त्यानुसार वाढीव भाडे देणे ही मागणी होती. तशीच आमची याचिका आहे. न्यायालयाच्या सूचनेवरून आम्ही म्हाडाच्या प्रस्तावावर विचार केला. मात्र आता म्हाडानेच भूमिकेत ‘यू टर्न’ घेतला हे आश्चर्यकारक आहे, असे अॅड. अंतुरकर यांनी नमूद केले. तसेच याबाबत आता न्यायालयाने म्हाडाला आधीच्या प्रस्तावाला अनुसरून घरे हवी असलेल्या दुकानदारांना घरे देण्याबाबत निर्देश देण्याची विनंती केली. त्याची दखल घेत खंडपीठाने 15 जूनला पुढील सुनावणी ठेवली.
n म्हाडाने मागील सुनावणीवेळी न्यायालयात मांडलेल्या प्रस्तावाला अनुसरून दुकानदारांनी घरांचा पर्याय निवडण्यास तयारी दर्शवली. जवळपास 45 दुकानदारांनी घरांचा पर्याय निवडण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले, मात्र म्हाडाने भूमिका बदलल्यामुळे वरळीसह नायगाव, डिलाईल रोड (ना. म. जोशी मार्ग) येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील दुकानदारांना मोठा धक्का बसला आहे. म्हाडाच्या भूमिकेवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला असून त्या अनुषंगाने न्यायालय कोणता निर्णय देतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





























































