
अकलूज व पंढरपूर या पालखी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पालखी दिंडय़ांसोबत असणाऱ्या वाहनांशिकाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांनी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा 1951च्या कलम 33(1)(ब) अन्वये हे आदेश निर्गमित करण्यात आले असून, दि. 21 जून 00.01 वाजल्यापासून ते 29 जून 2023 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहतील.
दि. 23 ते 30 जून या कालावधीत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढीवारी संपन्न होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 23 जून रोजी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत आणि 24 जून रोजी श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव वाखरी मार्गे पंढरपूरकडे येत असते. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज, श्रीपूर, बोरगाव, तोंडले-बोडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूरकडे येत असते. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात.
पालखीबरोबर त्यांच्या दिंडय़ा व वाहनेही सोबत असतात. त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता पालखी सोहळ्यादरम्यान पालखी सोहळ्यातील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे पालखी दिंडय़ासोबत असणाऱ्या वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या वाहनांनी (अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून) उपलब्ध असणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
मार्ग व पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे
- पंढरपूरकडून पुणे येथे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग – वाखरी-साळमुख चौक-पिलीक- म्हसवड-फलटण, पंढरपूर-टेंभुर्णी-पुणे.
- पुणे-फलटण येथून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग – फलटण चौक-म्हसवड-पिलीक-साळमुख चौक, पुणे-टेंभुर्णी-पंढरपूर.
- अकलूज येथून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग- अकलूज-टेंभुर्णी-सोलापूर.
- सोलापूर येथून पंढरपूर मार्गे अकलूजकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग- सोलापूर- टेंभुर्णी- अकलूज.
- वेळापूर येथून पंढरपूरकडे येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग – साळमुख चौक-सातारा रोड-पंढरपूर.
- सांगोला येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग – सांगोला -साळमुख चौक-वेळापूर-अकलूज- इंदापूर.
- पुणे येथून इंदापूर मार्गे पंढरपूर येथे येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग – पुणे- टेंभुर्णी-पंढरपूर.



























































