चक्रीवादळ मॉन्सूनच्या आगेकूचसाठी पूरकच…लवकरच मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
monsoon-in-maharashtra

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईत अजूनही उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे चक्रीवादाळामुळे पुन्हा मॉन्सून लांबणार का, असा प्रश्न पडत आहे. मात्र, हे चक्रीवादळ मॉन्सूनच्या आगेकूचसाठी पूरक असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीकडे वाटचाल करीत आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच ठरले आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदाराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. या वेळी वाऱ्याचा वेग 150 किमोमीटर प्रती तासांवर जाण्याची शक्यता आहे. कच्छ परिसराला वेगवान वारे आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसेल. कच्छसह द्वारका, मोरबी, पोरबंदर, राजकोट परिसरात 125 ते 135किलोमीटर वेगाने वारे वाहील. वाऱ्याचा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. कच्छ आणि द्वारका जिल्ह्यांत सर्वाधिक हानी होऊ शकते. गुजरातच्या अन्य भागात पावसाची शक्यता आहे. राज्यस्थान दक्षिण भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

चक्रीवादळ गुरुवारी, सायंकाळी जाखू बंदर परिसरात धडकेल. त्यानंतर वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होऊन चक्रीवादळाचा प्रभाव संपून जाईल. साधारण अठरा जूनपर्यंत चक्रीवादळाचा प्रभाव राहील. 18 जून ते 21 जून दरम्यान मोसमी वारे वेगाने वाटचाल करून संपूर्ण दक्षिण भागात व्यापून पुढे वाटचाल करतील. केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मोसमी पाऊस चक्रीवादळामुळे वेगाने पुढे सरकला. चक्रीवादळाचा प्रभाव संपताच मोसमी वाऱ्यांचा वेग आणखी वाढेल. चक्रीवादळ ओमानच्या दिशेने गेले असते तर मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला असता. मात्र, देशाच्या किनारपट्टीकडे सरकल्यामुळे देशाच्या काही भागात चांगला पाऊस होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.