
अमिताभ बच्चन जसे सिनेमात सर्वांना हवेहवेसे वाटतात तसेच अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, ते सर्वांनाच आपल्याकडे हवेत असे वाटते, अशा मिश्कील शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिंधे गटाने अजित पवार यांना दिलेल्या ऑफरचा समाचार घेतला.
अजित पवार हे कार्यक्षम मंत्री आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत, सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावे. ते आमच्याबरोबर आले तर आम्हाला आनंदच होईल अशी ऑफर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. माध्यमांनी त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांना अमिताभ बच्चन यांची उपमा दिली.
अमिताभ बच्चन सिनेमात सर्वांना हवे असतात. कारण सिनेमात त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो तशीच त्यांची स्वाक्षरीही चालते. तसेच राजकारणात अजितदादा सर्वांना हवेसे वाटतात, अशी मिश्कील टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
शिंदे-फडणवीस सरकारमधील सगळेच लोक तू-तू मैं-मैंमध्ये अडकले आहेत. तू काय म्हणाला, मी काय म्हणालो, तू कोणाचा अपमान केला, मी तुला कसं खाली दाखवतो, मी तुला कॅबिनेटमधून कसं ड्रॉप करतो यामध्येच ते व्यस्त आहेत. असे असेल तर महाराष्ट्राचे कामच थांबले आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
कोटय़वधींच्या जाहिराती देणारे हितचिंतक शोधतोय
शिंदे गटाच्या वतीने वृत्तपत्रांमध्ये कोटय़वधी रुपयांच्या जाहिराती देणारे हितचिंतक कोण आहेत त्याचा शोध आम्ही घेत आहोत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. अजितदादा जळगावला गेले आहेत आणि मी पुण्यात होते. आम्ही दोघेही शोध घेत आहोत. पण हितचिंतक अजून सापडलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
लोकसभा माझ्याकडे, राज्यसभा प्रफुल्ल पटेलांकडे
कार्याध्यक्षपदाच्या जबाबदाऱयांचे विभाजन क्लिअरकट झाले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. लोकसभेचे काम आपल्याकडे, तर राज्यसभेचे प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात संघटनेची जबाबदारी माझ्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































