कौसल्येचे माहेर…चंदखुरी !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

छत्तीसगडचा प्रदेश असंख्य कथा, दंतकथा, आख्यायिकांनी बहरलेला आहे. या कथा आहेत रामायणातल्या, महाभारतातल्या, पौराणिक देवीदेवतांच्या. इथल्या आदिवासी मंडळींचे जीवन या कथांशी जोडले गेलेले आहे. आदिवासीच नव्हे तर छत्तीसगडच्या प्रजेचे या कथांशी फार जवळचे नाते आहे. इथे शास्त्राची कसोटी कामी येत नाही. कारण या समजुतींच्या मुळाशी असते अपरंपार श्रद्धा, जी कुठल्याच परिमाणात मोजता येत नाही किंवा आज उपलब्ध असलेल्या शास्त्राच्या कुठल्याही कसोटीवर तपासून घेता येत नाही. श्रद्धा ही निव्वळ समजून घ्यायची असते, अनुभवायची असते आणि म्हणूनच जेव्हा या लोकांच्या तोंडून काही कथा, आख्यायिका ऐकायला मिळतात तेव्हा त्या मनाला फार भावतात.   

छत्तीसगड म्हणजेच रामायणकालीन कोसल प्रदेश. या प्रदेशाचा राजा होता भानुमंत. याची एकुलती एक कन्या होती कौसल्या. तिचा जन्म झाला रतनपूर इथे. होय, तीच कौसल्या जी अयोध्येच्या राजा दशरथाची पत्नी आणि प्रभू रामचंद्रांची माता. कौसल्या एकुलती एक मुलगी असल्याने राजा भानुमंताच्या नंतर या राज्याची जबाबदारी राजा दशरथावर आली. पुढे जेव्हा रामाला वनवासात जावे लागले तेव्हा त्याचा बराच काळ याच कोसल प्रांताचा भाग असलेल्या दंडकारण्यात गेला. म्हणजेच रामाच्या आजोळच्या प्रदेशात गेला. आजचा बस्तरचा भाग म्हणजेच रामायणकालीन दंडकारण्य होय. याच दंडकारण्यात महर्षी वाल्मीकींचा आश्रम होता आणि इथेच लव आणि कुशाचा जन्म झाल्याचे समजले जाते.

राजधानी रायपूरपासून 27 कि.मी. अंतरावर आहे चंदखुरी. इथे असलेल्या जलसेन तलावाच्या मधोमध आहे माता कौसल्येचे मंदिर. हे हिंदुस्थानातील एकवेम कौसल्येचे मंदिर आहे. इथल्या मंदिरात प्रभू श्रीराम बालकरूपात असून ते कौसल्येच्या कुशीत विसावले असल्याचे शिल्प आहे. या मंदिराचा इतिहास असा की इ.स.च्या आठव्या शतकात इथे सोमवंशी राजांचे राज्य होते. एकदा राजाला कौसल्येने स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की, ती या ठिकाणी जमिनीखाली आहे. त्या स्वप्नानुसार राजाने लोकांना बोलावून इथे खोदले असता प्रभू रामाला कुशीत घेतलेल्या कौसल्येची मूर्ती मिळाली. राजाने या जागेवर मोठे मंदिर उभारले. पुढे या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केला गेला. सध्याचे मंदिर म्हणजे 1973 साली जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. गाभाऱ्यात कौसल्या आणि तिच्या जवळ श्रीराम अशा मूर्ती. गाभाऱ्याच्या दोन बाजूंना महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. देवळाचे खांब, छत, भिंती यावर विविध चित्रे काढलेली आहेत. मंदिर परिसर आता आधुनिक आणि आकर्षक केलेला आहे. त्यामुळे भल्यामोठ्या कमानी, प्रशस्त आवार असे इथे बघायला मिळते. मंदिराभोवती असलेल्या तलावात एका बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती तर तलावाच्या दुसऱ्या बाजूला समुद्रमंथनाचे शिल्प केलेले आहे.

कौसल्या मंदिर परिसर जलसेन तलावाच्या मधोमध असल्यामुळे तिथे जाण्यासाठी एक मोठा सेतू बांधलेला आहे. हनुमान सेतू असे त्याचे नाव. हनुमान सेतूच्या दोन्ही बाजूंचे कठडे त्यावर दिवे लावून सुशोभित केलेले आहेत. हा सेतू जणू हातांवर उचलून धरला आहे असे दाखवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंनी सहा-सहा हात दाखवले आहेत. त्यामध्ये दिवे लावलेले आहेत. रात्रीच्या वेळी हे सगळे दिवे लागले की, हा परिसर मोठा मनोरम दिसतो. कौसल्या मंदिराच्या बाजूलाच वैद्य सुषेणाची मूर्ती बघायला मिळते. ही एक दुर्मीळ मूर्ती समजायला हवी. कारण हिंदुस्थानभरात अन्यत्र कुठेही वैद्य सुषेणाची मूर्ती दिसत नाही. सुषेण हा रावणाचा वैद्य होता. याच्या सांगण्यावरूनच लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणली गेली. रावणाच्या वधानंतर सुषेण रामाबरोबर इकडे आला आणि तो इथेच राहिला अशी कथा आहे. चंदखुरी हे गाव आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध होते. वैद्य सुषेण आणि आयुर्वेदिक औषधी यांचा असाच काहीसा संबंध जोडला गेला असावा.

हनुमान सेतू ओलांडून मंदिराकडे जाताना आता डावीकडे श्रीरामाची 50 फूट उंच मूर्ती उभारली आहे. डाव्या हातात धनुष्य, खांद्यावर बाणाचा भाता, उजवा हात अभय मुद्रेत, गळ्यात प्रलंब हार अशी ही मूर्ती आता पर्यटकांचे आकर्षण झालेली आहे. श्रीरामाच्या मूर्तीच्या शेजारी रामनामात तल्लीन झालेल्या हनुमंताची मूर्ती केलेली आहे. बाजूला हिरवळ केलेली असून श्रीरामाच्या मूर्तीच्या पायापर्यंत जाता येते. माता कौसल्या आणि वैद्य सुषेण यांचे एकमेव मंदिर आणि त्याच्या भोवतीचा इथला रमणीय परिसर. इथे येताना मुद्दाम संध्याकाळच्या वेळी यावे. इथून परत निघताना हा सगळा परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो तेव्हा तो पाहणे जास्त आनंददायी असते.

[email protected]