अवती/भवती – वसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुहास मळेकर

एसटी स्टँडला उतरल्यावर पत्नीसह दोन लहान मुलांना घेऊन चार-पाच गाठोडय़ांसह एक बाप हमालाची वाट पाहत होता. लोकल पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर त्यांना जायचे होते.
एक हमाल आला, त्याने अवाच्या सवा मजुरी सांगितली. परवडत नव्हती म्हणून बापाने नको सांगितले.
दुसरा आणि तिसरा हमाल आला… त्यांनीही उघडपणे एकमेकांना खाणाखुणा करत आणखी जास्त मजुरी सांगितली.
आता ‘मीच कसा सोयीस्कर होतो’ असे म्हणत पहिला भाव खाऊ लागला.
शेवटी वैतागलेल्या बापाने बायको आणि मुलांकडे गाठोडे दिले आणि स्वतः मोठी ट्रंक खांद्यावर मारून सरळ रेल्वे स्टेशनचा रस्ता धरला.
अर्थात, ही घटना त्या मुलाच्या मनात घट्ट रुतून बसली.
कालांतराने बाप गेला… मुलगा मोठा झाला.
तो आता बाप झालेला गरीब मुलगा एकदा त्याच्या मुलांना घेऊन जत्रेला गेला. दुर्दैवाने त्याच्या मुलाची चप्पल जत्रेत तुटली.
‘‘भाऊ चप्पल शिवून देता का जरा?’’ वडिलांनी जत्रेतील एका दुकानदाराला विचारले.
‘‘ही चप्पल नाय शिवता येणार.’’
वडिलांनी रांगेतील आणखी दुकानदारांना विचारले, त्यांनीही हेच उत्तर दिले.
नवीन चप्पल घ्यावी म्हणून त्यांची ढकलाढकल चालू होती, पण तुटपुंज्या पैशात मुलांना जत्रा फिरवायला आणलेल्या या गरीब बापाला ते परवडणारे नव्हते.
‘‘आणा सुई-धागा, मीच शिवतो!’’ तिथेच मांडी घालून बसत बापाने एका दुकानदाराला विनंती केली.
चप्पल व्यवस्थित शिवून झाल्यानंतर ‘‘सांगा, किती देऊ?’’ असे त्या बापाने दुकानदाराला विचारले.
‘‘काय साहेब, लाजवता!’’ तो
दुकानदार म्हणाला.
त्याचा मुलगा हे सर्व निरखून पाहत होता.
त्या बापाने आपल्या वडिलांचा वसा आता त्याच्या मुलाकडे सोपवला होता.