
स्वयंपाकातील अनेक अन्नपदार्थांपासून सौंदर्योपचारापर्यंत लिंबाचा वापर हमखास केला जातो. सौंदर्यवाढीसाठी करायच्या उपचारामध्ये लिंबाचा रस घातला जातो. आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचे काही थेंब घातले जातात. यामुळे चेहरा आणि त्वचा उजळ, चमकदार व्हायला मदत होते. लिंबाच्या रसात अँण्टीफंगल गुणधर्म असतात. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन तजेलदार होतो यामुळे लिंबाच्या वापरामुळे त्वचेशी निगडीत काही समस्या सुटू शकतात.
लिंबात जीवनसत्त्व सी आढळते. लिंबाने स्क्रबिंग, मसाज करून घरच्या घरी फेशियलदेखील करता येऊ शकते. महागड्या ब्युटि ट्रिटमेंट्स करण्याऐवजी लिंबाच्या वापरामुळे अगदी स्वस्त, घरच्या घरी केलेल्या लिंबाचे फेशियल करू शकता. यामुळे चेहरा डागविरहीत, तजेलदार व्हायला मदत होऊ शकते.
स्क्रबिंग
लिंबाचा वापर करून स्क्रबिंग कसे करायचे ते पाहुया. यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ व्हायला मदत होईल. हे स्क्रबिंग करण्याकरिता एका वाटीत लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये एक चमचा मध आणि 1 चमचा साखर घालून मिश्रण मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. 5 मिनिटे हलक्या हाताने चेहरा स्क्रब करा. 10 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
मसाज
स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला मसाज करण्यासाठी एका वाटीत लिंबाचा रस, 2 चमचे एलोवेरा जेल घेऊन पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारेल. चेहरा हायड्रेट होईल.
फेसपॅक
स्क्रबिंग आणि मसाज केल्यानंतर शेवटी फेसपॅक लावण्यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घ्या. त्यात बेसन, एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्याला 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

























































