बावन कुळं काय पाचशे बावन्न कुळं जन्मली तरी मुंबईला तोडू शकणार नाही, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी येथे आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे भव्य शिबीरात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नांवर बोलतानाही त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.

”त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची वखार लुटली होती. आता जे वरती बसले आहेत ते मराठ्यांची मुंबई लुटतायत, हे तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या डोळ्या देखत होणारी लूट तुम्हाला चालणार आहे का? हे सरकार म्हणजे उठसूट लुटालूट असं चाललं आहे. उठला की लुटला. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली होती. तेव्हा मोरारजींना मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती. आता हे आले आहेत त्यांना मुंबईचं महत्त्व वाढवू द्यायचं नाही. शिवसेनाप्रमुखांनी तेव्हाच इशारा दिलेला की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायचा जर कुणी प्रयत्न केला तर ती व्यक्ती कुणीही जरी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आता मुंबईचं महत्त्व कमी करायचं, मुंबईचा महसूल मारायचा. पण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही मुंबईचं महत्त्व कमी होऊ देणार नाही. मुंबई तोडणं तर तुमच्या बावन कुळं काय तर पाचशे बावन्न कुळं जन्मली तरी तुम्हाला जमणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.