…तर मशीद उखडून गंगेत फेकून देऊ! योगी सरकारमधील मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या मंत्रिमंडळातील एका कॅबिनेट मंत्र्याने वादग्रस्त विधान केलं आहे. प्रयागराज येथील मशीद ही अवैध असून ती हटवली नाही तर उखडून गंगेत फेकून देण्यात येईल, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

संजय निषाद असं या नेत्याचं नाव आहे. निषाद हे उत्तर प्रदेश सरकारमधील मत्स्य विभागाचे मंत्री आहेत. उत्तर प्रदेशमध्ये निषाद समुदायाचं नेतृत्व करण्यासाठी निषाद पार्टी या पक्षाची स्थापना त्यांनी केली होती. प्रयागराज जिल्ह्यात श्रुंगवेरपूर येथील निषादराज किल्ल्यात असलेल्या मशिदीवरून संजय निषाद यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

संजय निषाद हे सोमवारी जिल्हा मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, तेव्हा निषादराज किल्ल्यात उत्खनन केलं गेलं होतं. तेव्हा इथे कोणतीही मशिद नव्हती. यासंदर्भात पुरातत्व विभागाचा अहवालही आहे. याचा अर्थ ही मशीद नंतर तयार करण्यात आली असून ती अवैध आहे. तसंच, हा किल्ला हिंदू आणि निषादांचं श्रद्धास्थान आहे. मुस्लीम आता लव्ह जिहादसोबत भूमीजिहादही करणार का? जर ही मशीद तिथून हटवली गेली नाही, तर निषाद समुदाय ती मशीद तिथून उखडून गंगेत फेकून देईल, असं वादग्रस्त विधान संजय निषाद यांनी केलं आहे.

वाद ओढवून घेण्याची ही निषाद यांची पहिली वेळ नाही. उत्तर प्रदेशमध्ये सध्या भीषण उन्हाळा असून त्यामुळे झालेल्या मृत्यूंना त्यांनी दैवी संकट असं संबोधलं आहे. त्यामुळेही आधीच वाद निर्माण झाला आहे.