
केंद्र आणि राज्य सरकारकडून राजकीय विरोधकांविरुद्ध तपास यंत्रणांचा खुलेआम गैरवापर होत असून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आडून सुडाचे राजकारण सुरू आहे. कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानावर ईडीने छापा मारला. या छापेमारीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून केंद्र आणि राज्य सरकारला कडक शब्दात सुनावले.
सत्य, न्याय-हक्कांसाठी, लोकशाही आणि जनतेसाठी आम्ही लढायला तयार आहोत. त्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई करतेय. सत्तेविरोधात लढणाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. सरकारच्या मनात भीती बसली असून ही चांगली गोष्ट आहे. हे सरकार घाबरट आहे. तपास यंत्रणांना पुढे करून लढताहेत. नामर्दासारखे यंत्रणांचा वापर करून सरकार लढतेय. लढायचे असेल तर मर्दासारखे समोर येऊन लढावे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आता खोटा सर्व्हे त्यांनी बाहेर काढला आहे. त्यापेक्षा निवडणुकांना सामोरे जा. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत, त्यांनी मैदानात यावे. आपल्या देशात सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरू आहे. निवडणुका होत नाहीय. लोकप्रतिनिधी कुठे नाहीय. मोठमोठी टेंडर काढली जाताहेत. आमच्या मार्च्याला घाबरून आता कारवाया सुरू आहेत.
View this post on Instagram
हे मिंदे गट आहे, शिवसेना नाव नाही. गद्दारांच्या मागे कुणीही उभे नाही. त्यामुळे ते निवडणुकांना घाबरत आहे. दबावाचे तंत्र वापरले जात आहे. परंतु आम्ही दबावाला झुगारून लावतो. शिवसैनिकांवर दबाव टाकू शकत नाही, जे घाबरतात ते पलिकडे मिंधे गटात जातात. सत्यासाठी, न्याय-हक्कासाठी आणि देशातल्या लोकशाहीसाठी, जनतेसाठी लढायला आम्ही तयार आहोत आणि लढत आहोत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली.#AadityaThackeray pic.twitter.com/hznWIxFUns
— Saamana (@SaamanaOnline) June 22, 2023
दरम्यान, उद्या पाटणा येथे विरोधकांची बैठक नाही, तर देशभक्तांची बैठक होत आहे. त्या बैठकीलाही आपण जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.






























































