ठसा – भ. मा. परसवाळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या माणसांना व्यस्त राहण्यासाठी वयाची बाराखडी मोजण्याची कसरत करावीच लागत नाही. वाढत्या वयाबरोबर हिऱ्याची चमक या कर्तृत्ववान माणसांच्या आयुष्याला लाभत असते आणि त्यांच्या कार्याचा सुगंध सर्वदूर दरवळत राहतो. असेच एक व्यक्तिमत्त्व वयाच्या 80 व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा उैर्जेने काम करत एकेका नव्या प्रांतात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर दूर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून मराठवाडय़ाचे भूमिपुत्र, चिंतनशील, प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेले अव्वल दर्जाचे कलाकार आणि हाडाचे शिक्षक भ. मा. परसवाळे यांचे नाव घ्यावे लागेल. परसावाळे यांचा 1967 पासून काव्यलेखन आणि रेखाटने करण्याचा अव्याहत प्रवास आज 80 व्या वर्षातही दमदारपणे सुरू आहे. प्रगतिशील भूमिका असणाऱ्या या कविमनाच्या चित्रकाराचा मराठवाडा साहित्य परिषदेने ‘आरोह’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला असून, ‘रस्ते दुभंगत आहेत’ या  काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठsचा ‘केशवसुत पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. याशिवाय कल्पतरू पुरस्कार, शिवार पुरस्कार, विनायकराव चारठाणकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, मराठी साहित्य संघाचा बा. ग. ढवळे पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, गोविंद पुरस्कार आणि अस्मितादर्श पुरस्कार अशा प्रतिष्ठत पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. ‘एकत्रित’ या त्यांच्या नव्या-जुन्या कवितासंग्रहाचे संकलन मुंबईच्या मुक्तशब्द प्रकाशनाने केले आहे.

साहित्य अकादमीच्या वतीने प्रकाशित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ या पुस्तकात त्यांच्या मौलिक अशा कवितांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सामाजिक जाणिवांच्या कार्यक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात. परसवाळे हे स्टेट आर्ट काwन्सिल मुंबई येथे दहा वर्षे सदस्य होते. त्याचबरोबर वृत्तपत्रांतून त्यांनी ललितकलांवर लेखन केलेले आहे. साहित्य अकादमीच्या मुखपत्र असलेल्या अंकांची चित्रसज्जा त्यांनी आपल्या प्रतिभासंपन्न हाताने केलेली आहे. मराठीतील मौज, पॉप्युलर, लोकवाङ्मय, कॉन्टिनेन्टल, देशमुख अॅण्ड कंपनी तसेच साहित्य संस्कृती मंडळ यांच्या विविध मासिके, त्रैमासिक आणि ग्रंथ तसेच विविध ललित साहित्यप्रकारांची त्यांनी रंगवलेली मुखपृष्ठs विविध स्तरावर गाजली आणि समीक्षकांनी पसंत केली आहेत. हिंदीमधील वाणी प्रकाशन, दिल्लीसारख्या प्रतिष्ठsच्या प्रकाशन संस्थेत त्यांनी मुखपृष्ठs काढली आहेत. संस्कृती प्रकाशन, संगत प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन इत्यादींसह मराठीतील सर्वच प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ त्यांनी केलेले आहेत.

मराठवाडा, मौज, हंस, चौफेर, धनंजय, सृजन, अंतर्नाद इत्यादी दिवाळी अंकांची सजावट परसवाळे करीत असत. त्यामुळे त्या काळातील  दिवाळी अंक अत्यंत उल्लेखनीय आणि दखलपात्र झालेले आहेत. त्यांनी साहित्य अकादमीच्या वतीने मुंबई, कोल्हापूर व संभाजीनगर येथे व्याख्याने दिलेली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इत्यादींच्या संग्रही बोलक्या ऑइल पेंटिंग्जही त्यांनी चितारल्या आहेत.

नवीन विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी ऑनलाइन चित्रकला व अन्य ललितकला यावरदेखील त्यांच्या मुलाखती अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. अशा या हरहुन्नरी तसेच कला-साहित्यावर प्रेम करणाऱ्या उैर्जावान कलेच्या उपासकाची प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली हा त्यांच्या कार्याचा बहुमानच म्हणावा लागेल.

>> प्रा. पंजाबराव मोरे