
>> गणेश आचवल
सध्या झी मराठीवर ‘चंद्रविलास’ ही रहस्यमय मालिका चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्य म्हणजे त्यातील ‘तारा’ ही व्यक्तिरेखा आपल्या चांगलीच लक्षात राहते. ही भूमिका करणारी अभिनेत्री पूजा ठोंबरे….एक प्रॉमिसिंग चेहरा.
पूजाचे बारावीपर्यंतचे शिक्षण बीड येथे झाले. लहानपणापासून तिला अभिनय आणि नृत्य या कलांची आवड होती. एकांकिकांमध्येसुद्धा तिचा सहभाग असायचा. दरवर्षी संभाजीनगरमध्ये नाटकाचे निवासी शिबीर असायचे, त्यात पूजा आवर्जून सहभाग घेत होती. असेच एकदा बारावीच्या सुट्टीत मराठवाडा येथे अभिनयाचे निवासी शिबीर होते तेव्हा विविध ठिकाणांहून त्यात मुले-मुली सहभागी झाली होती. त्याच शिबिरात तिला पुण्यातील ललित कला केंद्राविषयी कळले आणि बारावीनंतर तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी ललित कला पेंद्रामध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. मग प्रवेश परीक्षा, मुलाखत असा टप्पा पार करून तिला ललित कला पेंद्रामध्ये अॅडमिशन मिळाली आणि तेथील शिक्षणाची तीन वर्षे पूजाला खूप काही अनुभव देणारी ठरली. आपल्याला स्वतःची काही मतं आहेत आणि आपण आपला विचार करून ती प्रभावीपणे मांडू शकतो, नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा हवा अशा अनेक गोष्टी त्या तीन वर्षांत तिला उलगडत गेल्या. तेथून ग्रॅज्युएशन झाल्यावर पूजाने ‘रानभूल’ या व्यावसायिक नाटकात भूमिका केली. पूजाने रंगभूमीवर गाजलेल्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातदेखील महत्त्वाची भूमिका केली होती. या नाटकाचे चारशे प्रयोग झाले आहेत.
पूजाच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला तो ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये तिने साकारलेल्या ‘अॅना’ या भूमिकेने. मग ‘दिल दोस्ती दोबारा’मध्येसुद्धा ती होती. ‘चंद्रविलास’मधील ‘तारा’च्या भूमिकेबद्दल पूजा म्हणते, ‘‘मी ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये साकारलेली ‘अॅना’ आणि आता चंद्रविलासमधील ‘तारा’ या पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहेत. ‘तारा’ ही एक गूढ व्यक्तिरेखा आहे. कवितेत बोलणारी, ‘चंद्रविलास’मध्ये राहणारी ती ‘तारा’ ही एक गावातील स्त्राr आहे. तिच्या भाषेचा लहेजा वेगळा आहे, त्याचा मी अभ्यास केला. शिवाय तिचे संवाद हे मालिकेतील गूढपणा अधिकच गहिरा करतात आणि आता ‘तारा’ ही भूत आहे हे प्रेक्षकांना कळले आहे. या भूमिकेसाठी विशेषतः ‘तारा’ जशी बोलते, तिची वेशभूषा जशी आहे, त्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी मला ‘अॅना’ आणि आता ‘तारा’ म्हणून स्वीकारले याचा मला आनंद आहे.’’



























































