तुमच्या ताटातले लोणी शुद्ध आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पराठा असो, सँडविच असो किंवा पावभाजी असो. प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्याकरता आपण लोण्याचा वापर करतो. लोण्याशिवाय पदार्थाची चव काही वाढत नाही, पदार्थाच्या वरुन लोणी घातले का तो पदार्थ अधिक चवदार आणि स्वादिष्ट लागतो. त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जणांना लोणी हा प्रकार फार आवडतो. तुमच्या ताटात येणारे लोणी भेसळयुक्त देखील असू शकते. त्यामुळे तुम्ही जे काही खात आहात ते नेमके काय खात आहात याची खात्री करुन घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकदा लोण्यामध्ये भेसळ केली जाते आणि त्यावर एखाद्या प्रसिद्ध कंपनीचे पॅकेजिंग लावून त्याची विक्री केली जाते.

तुम्ही भेसळयुक्त लोणी तर खात नाही ना?
सध्या बाजारात असंख्य अशा नावाजलेल्या लोण्याच्या कंपन्या आहेत. प्रत्येक जण आपल्या कंपनीचे लोणी हे उच्च प्रतिचे आणि भेसळमुक्त असल्याचा दावा करतात. पण, हे खरेच आहे का? लोणी हे खरेच भेसळमुक्त असते का? आणि तुमच्या ताटात येणाऱ्या लोण्यामध्ये किती शुद्धता आहे. तुमच्या घरी आणलेले लोणी खरच चांगल्या प्रतिचे आणि भेसळमुक्त आहे हे कसे ओळखाल?

लोण्याची भेसळ करताना त्यात काय मिसळले जाते?
विविध ब्रँडचे हायड्रोजनेटेड वनस्पती तेल, आयरिश बटाटा प्युरी, केळीचा लगदा, मेल्टेड फॅट, गहू आणि कॉर्न फ्लोअर, ताक या गोष्टी सामान्यता भेसळ करण्यासाठी वापरल्या जातात.

लोण्यामध्ये स्टार्च आहे की नाही कसे तपासावे?
भेसळीकरता लोणीमध्ये स्टार्च मिसळला जाऊ शकतो. ज्यातील भेसळ ओळखणे फार कठिण आहे. याकरता एका काचेच्या भांड्यात पाणी भरा. आता त्यात अर्धा चमचा लोणी टाका आणि त्यावर आयोडीनचे २-३ थेंब टाका. लोणीचा रंग जांभळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ आहे, हे सिद्ध होते. पण, काहीही झाले नाही तर त्यात भेसळ नसून ते शुद्ध आणि खाण्यासाठी सुरक्षित आहे.

लोणी गरम करुन त्याची भेसळ ओळखा
तुम्हाला खरे आणि शुद्ध लोणी ओळखण्यासाठी ते गरम करु शकता. लोणी गरम करुन त्याची तुम्ही शुद्धता ओळखू शकता. याकरता एक गोष्ट लक्षात ठेवा लोणी गरम केले आणि ते लगेच वितळले तर हे शुद्ध आहे. तसेच त्याचा रंग देखील हलका तपकिरी होतो. पण, भेसळयुक्त लोणी लगेच वितळत नाही. तसेच ते गरम केल्यावर त्याचा रंग पिवळा होतो.

खोबरेल तेल आणि लोणी
लोण्याची शुद्धता ओळखण्याकरता काचेच्या भांड्यात खोबरेल तेल वितळून घ्या. त्यात लोणी घाला आणि ते भांडे फ्रिजमध्ये ठेवा. थोड्यावेळाने तेल आणि लोणी वेगवेगळे झाले तर ते भेसळयुक्त लोणी आहे, हे लक्षात ठेवा. पण, ते एकत्र दिसले तर शुद्ध लोणी आहे.