
आठ वर्षांपूर्वी देशातील शंभर शहरांमध्ये सोलापूरचा स्मार्टसिटी प्रकल्पात समावेश करण्यात आला असून, अद्यापही पाणी, बससेवा, रस्त्यांचा विकास झालेला नसताना येत्या 25 जूनला महापालिकेच्या वतीने स्मार्टसिटीचा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 रोजी देशातील सोलापूरसह 100 शहरांत स्मार्टसिटी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सोलापूर शहरातील या प्रकल्पांतर्गत पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्याच्या हेतूने सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 2016 मध्ये करून 1694 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. आतापर्यंत फक्त 606 कोटी रुपयांची 42 कामे पूर्ण झाली आहेत. अद्याप 1037 कोटी रुपयांचे 6 प्रकल्प संथगतीने सुरू आहेत. यात प्रामुख्याने 895 कोटी रुपयांच्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा समावेश आहे. जो अद्यापही रेंगाळलेला आहे. यामुळे शहरातील पाणी समस्या भीषण बनली आहे.
याशिवाय रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प हे अद्यापही रेंगाळलेले आहेत. हेरिटेज वास्तूंच्या पुनरुज्जीवनांतर्गत महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीचे काम पूर्ण झाले असून, 100 वर्षांपूर्वीच्या लक्ष्मी मार्केटचा विकास ‘जैसे थे’ आहे. याशिवाय सिद्धेश्वर तलाव सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन, बससेवासारखे महत्त्वाचे उपक्रम रखडल्याने स्मार्टसिटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. शहराची लोकसंख्या प्रतिवर्षी घटत चालली असून, पाण्याच्या, बससेवेच्या, स्वच्छतासारख्या मूलभूत सुविधा देण्यात ही स्मार्टसिटी योजना अपयशी ठरल्याची चर्चा शहरात चालू आहे.
सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.च्या वतीने येत्या 25 जून रोजी 8 वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आयुक्त तथा स्मार्टसिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल तेली उगले यांनी दिली. यावेळी गेल्या 8 वर्षांत शहरात स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे उपस्थित होते.
फक्त 606 कोटींची कामे पूर्ण
z सोलापूर स्मार्ट सिटीसाठी एकूण 1694 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, पण यातील आतापर्यंत फक्त 606 कोटी रुपयांचीच कामे झाली आहेत. अद्याप 1037 कोटी रुपयांची कामे अपूर्ण असून, यामध्ये 895 कोटी रुपयांच्या उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचाही समावेश आहे.




























































