
नगर जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थांना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे आदेश शासनाने दिले खरे; मात्र स्थानिक स्कूल कमिटीला ‘बैठकी’साठी वेळ न मिळाल्याने अजूनही बहुतांश शाळांमध्ये जुन्याच गणवेशात मुले धडे गिरवत आहेत. दरम्यान, ‘दुकानदारी’ हेही त्यामागील एक कारण असल्याची कुजबूज सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱयांनी जिह्यातील सर्वच शाळांकडून गणवेशवाटपाची माहिती मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनुसूचित जातीचे 16597, जमातीचे 19207, दारिद्रय़रेषेखालील 10635 तसेच सर्व शाळांमधील मुली 1 लाख 13 हजार 259, अशा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 जूनला शालेय गणवेश वितरित करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी दिल्या होत्या. मात्र, अजूनही गणवेशवाटप झालेले नाही.
गणवेशासाठी चार कोटी 87 लाखांची रक्कम त्या-त्या शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांच्या संयुक्त बँक खात्यावर वर्ग झालेली आहे. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला आहेत. मात्र, अनेक ठिकाणी व्यवस्थापनाच्या बैठकीपूर्वीच मुख्याध्यापकांनी परस्पर गणवेश खरेदी केली, तर काही ठिकाणी सचिव या नात्याने मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या अजूनही बैठकाच बोलाविल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गणवेश खरेदीचा विषय अद्यापि अधांतरीच आहे.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची निराशा!
शाळांतील मुला-मुलींना पहिल्याच दिवशी गणवेश देण्याच्या सूचना करूनही बहुतांशी शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सोडाच; पण आठवडा उलटल्यानंतरही नवीन गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना अजूनही जुनाच गणवेश वापरावा लागत असल्यामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत.
गणवेश फाटला तर शाळांची जबाबदारी
गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापनाला आहेत. त्यामुळे गणवेशाचे कापड हे आयएसआय/बीआयएस दर्जाचे असावे. गणवेश लवकरच फाटला, विरला किंवा दर्जाहिन असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समितीवर असणार असल्याचेही शासनाने कळविले आहे.
15 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. किती शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश दिले, त्याची संख्यात्मक माहिती आपल्या स्वाक्षरीनिशी 22 जूनपर्यंत पाठवावी. गणवेश दिला नसल्यास त्याची कारणे कळवावीत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱयांना दिल्या आहेत.
– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

























































