साहित्यजगत – सुनील कर्णिक @ 75

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविप्रकाश कुलकर्णी

खरं तर कर्णिकांचा सत्कार याआधीच करायला हवा होता. तो न व्हायला कारणीभूत सुनीलच असणार. कारण पुढे पुढे न करण्याचा त्याचा स्वभाव. पण आता त्याला 75 वर्षे झाली आहेत. हे कोणाच्या लक्षात आलं का?   मात्र झालं ते चांगलं झालं. ज्यांनी काहीतरी केलं आहे त्याला योग्य वेळी दाद दिली की बरं असतं. एक चांगला पायंडा पडायला मदत होते. असं सुनीलने काय केलं आहे?   त्याचा कबुली जबाब त्याने पंचवीसेक वर्षांपूर्वी दिलेला आहे. तो म्हणतो, ‘इतकं छोटंसं आपलं आयुष्य. एका लहानशा वर्तुळात सदैव वावर. अशा संकुचित आयुष्यातही काही ना काही घडतच असतं.  गेली 25 वर्षं साहित्याच्या क्षेत्रात छोटी छोटी कामं मी करतोय. कधी ग्रंथालय सेवक तर कधी मुद्रितशोधक, कधी पुस्तकपोता तर कधी वृत्तपत्र प्रतिनिधी, कधी संपादक तर कधी प्रकाशक… एखाद्या वेळी अलिबागच्या छापखान्यात मुक्कामाला तर  कधीतरी ताजमहाल हॉटेलच्या हाऊस जनरलच्या कचेरीत. कधी जुन्या नव्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये नाना तऱहेची मासिकं, पुस्तकं धुंडाळात राहावं. तर कधी सभा-संमेलनांना हजेरी लावावी. कधी कविता लिहाव्यात, परीक्षणं खरडावी, मुलाखती घ्याव्यात तर कधी मोठय़ा साहित्यिकांच्या संगतीत राहावं. कधी एखाद्या प्रकाशकाच्या बरोबरीने त्याच्या पुस्तकाचे गठ्ठे खांद्यावर घेऊन सांगली, सातारा, मिरज, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर असा दौरा करावा. वर्ष सहा महिन्यांनी धंदा बदलला की नव्या जगाचं दर्शन. शिवाय आपलाच आपल्याला नवा अनुभव. अशा धरसोड धोरणाने फारसं काही हाती लागत नसलं तरी रंगीबेरंगी अनुभवांचे छोटेमोठे तुकडे मनाला चिकटून राहतात. हे तुकडेच आज कागदावर ठेवून पुन्हा एकदा पाहतोय…’

हे सर्व आंबट आणि तिखट अनुभव या पठ्ठय़ाने लिहिताना म्हटलं आहे, ‘सत्य हे नेहमी कडूच असतं असं नाही. ते आंबट, तिखट किंवा गोडही असू शकतं.’

हे सगळे अमृतानुभव एकत्र करून कर्णिक यानी त्याचं पुस्तक केलं आणि त्याचं नाव ठेवलं ‘न छापण्याजोग्या गोष्टी.’ त्याच्याखालीच त्यांनी म्हटलंय म्हणजे न लिहिण्याजोग्या, न वाचण्याजोग्या गोष्टी. अशा या कर्णिकांचं लग्न हे त्यावेळी चर्चेचा विषय होता. त्यावर ते सांगतात, ‘माझं लग्न बरंच उशिरा झालं होतं. त्यावरून सगळ्यांनी मला पिडलं. लग्न झालं ही माझ्या मित्रांसाठी मोठीच बातमी होती. रविप्रकाश कुलकर्णी तेव्हा पुस्तकांच्या जगातल्या घडामोडीविषयी छोटीमोठी चटपटीत टिपणं वर्तमानपत्रातून लिहायचा. माझं लग्न झालं की तो त्याबद्दल लिहिणार आहे. मी माझ्या होणाऱया बायकोला हे सांगितलं तर ती म्हणाली, तुम्ही त्याला सांगा, असं काही लिहू नको.

मग बरेच दिवस गेले. पण लग्नाचा विषय कोणाच्या चर्चेत येईनासा झाला. रविप्रकाशच्या स्तंभात आम्हाला प्रसिद्धी नाही ती नाहीच. नेमकं काय झालं असावं? एकदा मौजच्या प्रेसमध्ये गेलो होतो. तेव्हा संजय भागवत म्हणाले, तुमच्या लग्नाबद्दलचा मजकूर रविप्रकाशने आम्हाला दाखवला होता. पण तो संपादकांनी छापायला नकार दिला. त्यावरून त्या मजकुरात माझी अतिनिंदा किंवा अतिस्तुती असावी असा अंदाज मी केला.’

हे आणि अशा अनेक अंदरबाहर घटनांनी भरलेलं त्याचं लेखन त्याच्या या चार-सहा पुस्तकात आहे.  त्यावेळी सुनीलने जाहीर केलेल्या ‘मी उगाच सांगत नाही’, ‘रक्ता नात्याच्या गोष्टी’, ‘बाळाजी नारायण नातू’, ‘धकधक धक धक’, ‘हसण्यावारी’ आणि ‘पैसा तो क्या’ या पुस्तकांचं काय झालं? पंचाहत्तरीच्या शुभेच्छा देताना त्याची आठवण करून देतो एवढंच काय ते.