
भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना MIMमध्ये येण्यासाठी आम्ही ऑफर दिली होती असा दावा एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) जोरदार मुसंडी मारण्याची तयारी सुरू केली आहे. इतर पक्षांतील आजी-माजी नेत्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणाऱ्या बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, “बिआरएसच्या आधी आम्ही पंकजा मुंडे यांना ऑफर दिली होती. इम्तियाज जलील यांच्यावतीने पंकजा मुंडे यांना आम्ही २ वर्षांपूर्वी ऑफर दिली होती. पण त्यांना ही गोष्ट समजतच नाही. गरुड हवेच्या वासाने सांगतो की पाऊस होणार की नाही. पंकजा मुंडेंसोबत सध्या जे सुरु आहे, याची कल्पना इम्तियाज जलील यांनी त्यांना २ वर्षांपूर्वीच दिली होती. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. हा संविधानिक अधिकार आहे.”
बीआरएस आणि आमच्यात सध्या तरी महाराष्ट्रात एकत्र निवडणूक लढण्याचं ठरलेले नाही. असे यावेळी ओवैसी म्हणाले.



























































