
>> जयश्री संगीतराव
श्रीकृष्णाची सगळ्यात आवडती भार्या म्हणजे रुक्मिणी. त्याचे सगळ्यात जास्त प्रेम रुक्मिणीवर आहे हे तिलाही ठाऊक आहे. पण तरीही सत्यभामेच्या बाबतीत मात्र तिच्या मनात सवती मत्सर होताच. कधी कधी तर दोघींमध्ये भांडण लावून गंमत बघणे हा कृष्णाचा आवडता छंद होता. अशा या रुक्मिणीला पुढच्या विठ्ठल अवतारात तुळशीच्या रूपात जन्म देऊन युगे युगे कृष्णाचा तिच्याशी विवाह करण्याची प्रथा आपल्याकडे आहे.
आयुष्यात जे घडते ते अनुभव नव्हे, तर त्यातून तुम्ही काय शिकता, तो अनुभव. याच अनुभवाचे वर्णन श्रीकृष्णाने गीतेतून धनुर्धारी अर्जुनाला केले. धर्म म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजे धर्म! पण वेळ, काळ, व्यक्तीपरत्वे या कर्माचे रूप बदलते. काय चांगले काय वाईट नव्हे, तर काय योग्य याचे प्रमाण लावावे लागते. असा उपदेश देणारा साक्षात विष्णूचा अवतार असणारा भगवंत! त्याचे जीवन, त्याचा उपदेश हा कोणत्याही मोजमापात न तोलला जाणारा. मग अशा श्रीकृष्णाची नाना रूपे असतीलच. वागण्याच्या तऱ्हाही नाना. अगदी आकलनापलीकडचे सारे. त्याच्या आयुष्याशी बांधल्या गेलेल्या. स्त्री वर्गाचा विचार केला तर प्रत्येकीशी अगदी वेगळे सख्य. वागण्याची वेगळी तऱ्हा, सारेच अगम्य, न कळणारे. तरीही त्या व्यक्तिरेखेचा विचार करता अगदी चपखल बसणारे आहे. अरे, कृष्ण असाच असावा असे वाटणारे. असे हे अतर्क्य अद्भुत रूप म्हणजे भगवंत श्रीकृष्ण!
श्रीकृष्णाची सगळ्यात आवडती भार्या म्हणजे रुक्मिणी. त्याचे सगळ्यात जास्त प्रेम रुक्मिणीवर आहे हे तिलाही ठाऊक आहे. पण तरीही सत्यभामेच्या बाबतीत मात्र तिच्या मनात सवती मत्सर होताच. कधी कधी तर दोघींमध्ये भांडण लावून गंमत बघणे हा कृष्णाचा आवडता छंद होता. अशा या रुक्मिणीला पुढच्या विठ्ठल अवतारात तुळशीच्या रूपात जन्म देऊन कृष्णाचा तिच्याशी विवाह करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. अशा या रुक्मिणीचा लटका रुसवा तिच्याच शब्दांमधून…
‘राधा दामोदर चिंतन सावधान…!’ शब्द निनादले अन् अंतरपाटाआड कृष्णसख्यासमोर तुळशीच्या रूपात असलेली माझ्यातली रुक्मिणी पुन्हा विचारपात अडकली. याही जन्मात कृष्णाशी एकरूप होताना राधा आहेच सावली बनून. माझं मन कुरकुरलंच. घनश्याम म्हणतात, तशी खरंच मी त्यांची आवडती भार्या असेन का? खरं तर माझा विवाह शिशुपालाशी व्हावा असं भ्राता रुक्मीला वाटत होतं. पण त्यांचं माझ्यावर जडलेलं प्रेम सफल झालं. विवाहपूर्वी देवीचं दर्शन घ्यायला मी जाताच माझ्याच इच्छेने व मी पत्रात केलेल्या आर्जवाने त्यांनी माझं हरण केलं आणि आमचा विवाह झाला. असे असतानाही माझ्यातली पत्नी नेहमीच साशंक का होते? पण प्रत्येक वेळी माझा रुसवा कसा काढायचा हे मात्र त्यांनी बरोबर हेरलं होतं. एकदा तर गंमतच झाली बरं का! त्रिभुवनात भ्रमण करणारे नारद मुनी प्रासादात आले. स्वभावाप्रमाणे ते मला म्हणाले, कधी विचारलं का त्याला, तू प्रिय आहेस की सत्यभामा? सत्यभामेचं नाव घेताच माझ्यातल्या बायकोने कान टवकारले. मी लगेच कृष्णाला विचारलं, तर म्हणाले, तुम्ही दोघीही मला प्रिय आहात. ती साखरेसारखी तर तू मिठासारखी. झालं माझ्या रागाचा पारा चढला. चार दिवसांनी घरी मेजवानी होती. मी गप्पच होते. सगळी पंगत बसली. पंचपक्वान्ने वाढली गेली. पण पंगतीत एकच गलका झाला. मीठ आणा, मीठ आणा. मला काय समजायचं ते समजलं. कारण मीठ कशातच घालायचं नाही हे त्यांचंच फर्मान असावं. नव्हे होतंच. म्हणजेच माझं त्यांच्या मनातलं स्थान ते सांगून गेले.
हे सारं काही पटतं मनाला. पण सवती मत्सर असतोच ना? त्यात नारद येऊन गेले की हमखास काहीतरी ठिणगी पडतेच. स्वर्गातल्या पारिजातकाला गिरीधर म्हणे पृथ्वीवर रुजवणार हे भाकीत त्यांनीच मला सांगितलं. पण कुठे? त्यांनी सोयीस्करपणे टाळलं. पण बघ हं रुक्मिणी… सत्यभामेला कदाचित हे ठाऊक असू शकतं. एवढी काडी मात्र ते लावून गेले. मी गप्पच होते. झालंही तसंच. वृक्ष लागला सत्यभामेच्याच परसात. माझ्यातल्या बायकोने परत वर डोकं काढलं. यावेळी मात्र मी जास्तच रुसले. अबोलाच धरला. त्यांनी रुसवा काही काढला नाही. ना काही विचारलं. जणू काही घडलंच नाही असं ‘अळी मिळी गुपचिळी’ चालूच होतं. मी मात्र रागाने धुमसत होते. पारिजात मला काही शांत झोपू देईना. मनात राग इतका होता की, त्या बाजूचा झरोका मी बंदच करून टाकला. पण एक दिवस पहाटे मस्त पावसाची सर येऊन गेली. गार वारा सुटला होता. आजची झुळूक काही वेगळीच होती. एक सुंदर सुगंध होता त्यात. इतका ईश्वरीय गंध कुठून येतोय? कशाचा असेल? काही कळेना. त्याने मनाला भुरळ घातली एवढं मात्र खरं. मी बंद झरोका उघडला. बघते तर काय, पारिजातकाचा सडा माझ्या अंगणात पडला होता. मी धावत परसदारी गेले. फुलं ओंजळीत घेतली आणि भानच हरपून गेलं माझं. किती वेळाने लक्षात आलं सत्यभामेच्या अंगणात रुजलेल्या या झाडाची फुलं मात्र माझ्या अंगणात पडली होती. काय म्हणू तरी काय सख्याला! खरंच कोणाला कसं खूश करायचं ही किमया त्यांना चांगलीच अवगत आहे. एक गोष्ट मात्र खरी. प्रत्येक अवतारात मी त्यांच्यासवे राहणार हे मला दिलेलं वचन मात्र त्यांनी पाळलं.
पण इथेही त्यांनी माझी छेड काढलीच. विठ्ठल अवतारात रखुमाई म्हणून मी होतेच त्यांच्या सवे. पण तिथेही त्यांनी राधेला दिलेलं वचन पाळलंच. राई म्हणून दुसऱ्या बाजूला आलीच की राधा. काय संताप झाला माझा. पण त्यावरही त्यांचं उत्तर आणि उपाय होताच. म्हणाले, अगं तुळशीचा अवतार म्हणजे तूच नाही का? शिवाय दरवर्षी कार्तिकी द्वादशीला माझा विवाह तुझ्याशीच नाही का होणार. म्हणजे मी तुझ्याच बंधनात राहणार ना जन्मोजन्मी. खरंच तुळस म्हणजे मीच! कृष्णाला प्रिय तुळस विठ्ठलाच्या गळ्यात म्हणजे हृदयावर मी विराजमान हे मला कळत का नाही. पण माझा आपला लटका राग असतोच. सगळं कळतं रे भगवंता, पण वळत नाही ना. सवती मत्सर हा स्त्री स्वभावातला एक पैलू तुम्हीच तर दिला स्त्राrला. मला वाटतं भांडण लावून मजा बघण्याची खोड त्यांची लहानपणापासूनची. तेव्हा गोपींच्या संसारात भांडण लावायचे आणि नंतर स्वतच्या संसारातही. वर स्वत नामानिराळे राहायचं. भगवंताचं हे सारं अस्सं. तरी चराचरावरचं त्यांचं असलेलं प्रेम अगाध आहे. गोप, गोपीवरचं निखळ प्रेम, सुदाम्याचे नि:स्वार्थ मित्रप्रेम, राधेचं प्रेम ज्यात समर्पण आहे. मीरेचं प्रेम ज्यात शुद्ध भक्ती आहे. पांडवांचं प्रेम त्यात विश्वास आहे, सत्य आहे. अर्जुनासाठी तू आणि तुझ्यासाठी अर्जुन तर देह आणि आत्म्याच्या मिलनासारखा आहे. पांचालीच्या प्रेमात बंधुभाव आहे. आपल्या भक्तावर त्याचं मनापासून प्रेम होतं आणि आहे. आज तुळशीच्या अवतारात मात्र एक जाणीव झाली. या सगळ्यांवर प्रेम करताना माझी जागा मात्र फक्त माझीच आहे. आज सांगावंसं वाटतंय. हृदयावर विराजमान केले तुम्ही मला. शुद्धता अर्पण केली. अंतिम समयीसुद्धा जाणाऱ्या आत्म्याशी माझा संबंध घडतो तो केवळ तुझ्यामुळेच.
सुहासिनी जेव्हा मला पाणी घालून सौभाग्य मागतात ना, तेव्हा माझ्या सौभाग्याचा खूप अभिमान वाटतो मला. कारण न मागताच तू मला तुझ्या हृदयावर विराजमान केलंस. आता माझं काहीही मागणं नाही. राग नाही हट्टही नाही. कृष्णासवे रुक्मिणीचं नाव नाही घेतलं गेलं तरी काही हरकत नाही. कारण ती बांधली गेली त्याच्या सवे जन्मोजन्मी. त्यांच्या सवे होती आणि राहणारही जोपर्यंत हे चराचर आहे, ब्रम्हांड आहे तोपर्यंत.
कसे वागणे सख्या तुझे हे
कधीच तुजला उमगू न शकले
तू माझा अन् तुझीच मीही
जन्मोजन्मीचे नाते अपुले…

























































