
बिहारमधील भागलपूर येथे शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका युवकाचा मृत्यू झाला, तर एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या स्फोटामुळे 100 मीटरच्या अंतरावरील घरांच्या काचा फुटल्या. हा स्फोट एवढा जोरदार होता की मृतदेहाचे तुकडे झाले तर ज्या घराचा स्फोट झाला ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
अब्दुल गनी उर्फ वाडीब कुरेशी यांचा मुलगा तौसीफ कुरेशी असे या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याची आई सुलताना खातून, बहीण असिफा खातून, काका अब्दुल मन्नान आणि शेजारची मुलगी अरफा जखमी झाले आहेत. सुलतानाची प्रकृती अधिक गंभीर आहे. अब्दुल गनी हा लोदीपूर येथील एका मांसाच्या दुकानात काम करतो. हा सिलेंडरचा स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याचे त्यांनी सांगितले. कारण घरातून एक छोटा आणि एक मोठा सिलिंडर सुरक्षित सापडला आहे.
स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी त्यांनी अर्धा तास घटनास्थळाची तपासणी केली. या पथकाने घटनास्थळावरून नमुनेही गोळा केले. दरम्यान एफएसएल, एसडीआरएफ आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


























































