
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणण्याचे संकेत दिले असताना आज ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मोहम्मद अहमद खान दर्याबादी व अन्य सदस्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व समान नागरी कायद्याबाबत बोर्डाची भूमिका त्यांच्यापुढे मांडली. याअनुषंगाने विविध मुद्दय़ांवरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दर्याबादी यांनी अधिक तपशील दिला.
समान नागरी कायद्यावर देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या केंद्रीय समितीने ठरवले आहे. त्यानुसार आम्ही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही आम्ही चर्चा केली आहे. येत्या काळात आम्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहोत. भाजपच्या प्रमुख नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.






























































