
आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. त्याआधी तुम्हाला आयटीआर भरावा लागेल. ज्यांचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा व्यक्ती आयटीआर 1 अर्ज भरू शकतात. या उत्पन्नामध्ये वेतन, एक घर मालमत्ता, कौटुंबिक निवृत्तीवेतन उत्पन्न, कृषी उत्पन्न आणि इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश असतो.
कोण भरू शकतं?
‘आयटीआर 1’ फॉर्म अशा व्यक्तींना लागू आहे, ज्यांचे एकूण उत्पन्न एका आर्थिक वर्षात 50 लाखांपेक्षा जास्त नाही. त्यांचे उत्पन्न पगारातून किंवा घराच्या मालमत्तेतून व इतर स्रोतांमधून असेल तर ते ‘आयटीआर 1’ फॉर्म वापरून आयटीआर दाखल करू शकतात.
काय काळजी घ्याल?
‘आयटीआर 1’ फाइल करताना गुंतवणुकीचे सर्व पुरावे, ‘फॉर्म 16’ जवळ ठेवावा. आपला पॅन नंबर, पत्ता, संपर्क क्रमांक, बँक खाती इत्यादी तपशील अचूक असल्याची खातरजमा करून घ्यावी.
‘आयटीआर 1’ फॉर्मसाठी अपात्र
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक आहे, ते ‘आयटीआर 1’ फॉर्म भरू शकत नाहीत.
- रेसिडंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडंट (आरएनओ) आणि एनआरए अशा व्यक्ती किंवा ज्यांचे कृषी उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा जास्त अशा व्यक्ती ‘आयटीआर 1’ फॉर्मसाठी अपात्र आहेत.
- अनलिस्टेड इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक असल्यास.
- एखाद्या कंपनीचा संचालक आहे, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त घर मालमत्ता आहे आणि त्यापासून उत्पन्न मिळते अशा व्यक्ती या फॉर्मसाठी अपात्र.


























































