अनुभूतीचे अंतरंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद सावंत / अभिप्राय

कवी हा सभोवतालच्या वास्तवात वावरताना आपला स्वत:चा असा एक दृष्टिकोन मनाशी जपून वास्तव जगातल्या भाव-भावनांना मोकळी वाट करून देत जगण्याचे अर्थ मांडीत राहतो व त्यानुसार मतप्रणाली बनवून जगण्याचे ध्येय ठरवीत असतो. म्हणूनच कवी संजय पाटील यांच्यासारखा कवी आपल्या वैचारिक बांधिलकीला व आपल्या अनुभूतीला चार वेगवेगळ्या स्तरांवर विभागून आपल्या ध्येयधोरणांना जनसामान्यांपूढे आणू इच्छितो. ‘डार्क गडद काळ्या रंगाच्या कविता’ या भागाद्वारे वास्तवातील कवीच्या जाणिवांचे प्रश्न आणि त्याचा भवताल यांचा उद्रेकी भावरंग रंगवितो, पण हे रंगवताना त्याने सकारात्मकता संपूर्णपणे पुसण्याचा प्रयत्न केलेला नाही. कवीने सकारात्मकतेची झालर भोवताली सोडलेली आहेच, पण त्यात विद्रोहाचीही भर टाकलेली दिसते.

शेवटच्या भागात कवी सामाजिक जाणिवेच्या भावनेतूनच आलेल्या पर्यावरणाच्या भूमिकेलाही प्रोत्साहित करतो.‘हिरवेपणा ठेव जपून’ यातून कवी पर्यावरणपूरक भाष्य करताना दिसतो. त्यासोबत मानवी मनाच्या सकारात्मक भावनेला मोकळी साद घालतो व ती ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तसेच नदी आणि स्त्रीची तुलनात्मकता व दोघांच्याही नशिबी असलेले भोग यांचे तौलनिक स्पष्टीकरण देत जनमानसातील स्त्राrच्या उपरोधिक भावनांचा ऊहापोह करतो. ‘निरक्षर माणुसकी’ या कवितेतून ‘माणुसकी’ ही अक्षरं शिकवून किंवा माणसात बाहेरून आणून भरवता येत नाहीत, ती उपजत व संस्कारक्षमतेने अंगी भिनावी लागते हेच कवी सूचित करीत असावा (काळवंडलेल्या रक्ताच्या लाल कविता). ‘कवीची आई’ या कवितेतून परिस्थितीने अथवा जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या समाज व्यवस्थेने ओढवलेल्या कामाच्या रगाडय़ात जखडून कवी स्वत्व गमावून तर बसलेला असतोच, पण आपल्या जन्मदात्रीचेसुद्धा पांग फेडू न शकणाऱया कवीची व्यथा पाटील नकळत मांडून जातात.

आईवर कविता लिहिणारा कवी…
शहरात रममाण झाला आहे
आईला गावात एकटी सोडून

या शब्दांतच त्याचे वंचितपण सामावले आहे. त्यांच्या ‘दहशतवाद’ या कवितेत दहशतवादाचे एक वेगळेच रूप पाटील सांगू इच्छितात ते म्हणजे जी दहशत दिसते, कळते, पण माणसाला स्वत:पर्यंत आल्याशिवाय ती दहशत जोवर संवेदनेच्या कक्षा पार करून चटक्यांच्या जाणिवेने पोळत नाही, तोवर कळत नाही. ही समाज व्यवस्था हेच आभासी वातावरण कायम ठेवून भूमिपुत्रांच्या तोंडचे घास पळवतेय, ओरबाडतेय याची जाणही त्याला आहे. त्यामुळेच तो सहजगत्या म्हणतोय,

जे पेराल तेच उगवेल, इमान राखते माती,
भला व्यवहार विसरून माणसाने
का दिली माणुसकीला मूठमाती?

यात कवीचा उद्रेक जाणवतोच. संजय पाटलांची कविता माणसांच्या जाणिवा, भावना जपताना जशी संवेदनक्षम होत जाताना दिसते तशीच ती सकारात्मकतेने संस्कारक्षम उद्रेकाची भाषा वापरण्याची मानसिकताही राखून आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.

संजय पाटील यांची कविता व्यक्तित्वाच्या पातळीवर विचारविन्मुख होताना दिसते तशीच ती समाजमनाच्या पातळीवरही तितकीच उद्विग्न होत भाष्य करते. एखाद्या गोष्टीकडे पाहणाऱयाच्या दृष्टीचा साधा कोन जरी बदलला तरी वैचारिकदृष्टय़ा असणारे मतभेदही वेगळ्या वाटांतून आपला प्रवाह चोखाळतात हेच गमक पाटील ‘सीमारेषा ते क्षितिज रेषा’ या कवितेद्वारे उलगडू पाहतात. ‘काळोखातून उगवणाऱया उद्याच्या कविता’ या भागातून कवी उद्याच्या निर्माण होणाऱया मानसिकतेचे रंगप्रवाह बदलवू पाहण्याचे स्वप्नचित्र उराशी बाळगतो असेच म्हणावे लागते.

‘डार्क गडद काळ्या रंगाच्या कविता’
कवी : संजय पाटील
प्रकाशक : पायगुण प्रकाशन, अमरावती
पृष्ठे : 48 रुपये, मूल्य : 96 रुपये