मनतरंग – नाकावरच्या रागाला औषध हाय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

मूल स्वत:मध्ये बदल घडवू पाहात असतानाही पालक जेव्हा त्यांच्यावर अविश्वास दाखवतात तेव्हा ती अधिक बंडखोर व हट्टी होऊ लागतात. प्रत्येक मूल हे स्व-प्रतिमा तयार करत असते. त्यात त्याला स्वतच्या आवडी-निवडी कळत असतात. अशावेळी त्याला फक्त आपल्या आई-बाबांच्या संमतीपूर्ण आधाराची आवश्यकता असते.

आज आयुष (नाव बदलले आहे) पुन्हा दिवसभर उपाशी होता. त्यामुळे त्याच्या आईची, नंदिनीची तगमग वाढली होती. तिला कमालीचं टेन्शन आलं होतं. “आयुष जेवलेला नाही. म्हणजे मला त्याची आता भरपूर मनधरणी करावी लागणार. त्यात आयुषचे आजोबा, काका येतील…” त्या दोघांचा जसा विचार आला तशी नंदिनी चमकली, अस्वस्थ झाली. “अरे आयुष, दोन घास खाऊन घे. तुला काय हवंय?” असं तिने विचारताच त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.

नंदिनीला आता रडायला येत होतं. त्याने न खाल्ल्यामुळे तिनेही काही खाल्ले नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून नंदिनीने शेवटी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. ती त्याच्या जवळ जाताच तो जोरात ओरडला, “मला हात लावू नकोस. तू आजपासून माझी आई नाहीस.”

‘’आयुष…” नंदिनी थरथरली. अकरा वर्षांच्या मुलाच्या तोंडात हे असे शब्द? आई म्हणून नंदिनीला स्वतचीच लाज वाटायला लागली.
नंदिनीने त्याच दिवशी रात्री आयुषसाठी समुपदेशन घेण्याचे नक्की केले. आयुष हा सहावीत शिकत होता. लहानपणापासून त्याला राग प्रचंड होता आणि त्यातल्या त्यात त्याचा जास्त राग नंदिनीवरच निघायचा. तो पहिल्यापासूनच अभ्यासाचा कंटाळा करायचा. त्याचं खेळात आणि हुंदडण्यात जास्त लक्ष असायचं. त्याचे वडील नोकरीसाठी परगावी होते. त्यामुळे साहजिकच आयुषला सांभाळण्याची जबाबदारी ही नंदिनीसोबतच त्याच्या काका आणि आजोबांनी घेतली होती. आयुष मस्तीखोर होताच. त्याने काहीही मस्ती केली किंवा अभ्यासात दुर्लक्ष केलं तरी नंदिनी त्याची पार त्या दोघांकडे करायची. आयुषला मग त्या दोघांचा भरपूर मार पडायचा.

आयुष आणि ती पहिल्यांदाच समुपदेशन सत्रात आले होते. आयुष गप्पच बसून होता. थोडीफार घरची परिस्थिती, राहणीमान आणि आयुषच्या सवयी यांविषयी नंदिनीकडून माहिती घेतल्यानंतर तिला केबिनबाहेर पाठवण्यात आले. आता फक्त तो बसला होता…खाली मान घालून. शाळेबद्दल आणि मित्रपरिवाराबद्दल त्याला छेडले असता त्याने फक्त मान हलवून उत्तरे दिली. सरतेशेवटी जेव्हा आयुषला त्याच्या रागाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो पटकन म्हणाला, “मला सगळ्यांचा राग येतो” आणि पुन्हा शांत बसून राहिला.

आयुषला बोलतं करणं सोपं नव्हतं. त्याला आणि नंदिनीला आता काही दिवस सत्रे घेणं आवश्यक होतं. आयुषच्या रागावर काम करताना लक्षात आले की, त्याचा राग हा त्याला वाटणाऱया असुरक्षिततेमुळे निर्माण झालेला होता. ही असुरक्षितता आयुषच्या घरी असलेल्या अवास्तव शिस्तीमुळे जन्माला आली होती. अशा काहीशा अतिशिस्तीमुळे त्याला अभ्यासाची ओळख ही त्याच्या नकारात्मकतेने (नाराजीने, रडारडीने) झाली. त्यातच नंदिनीने त्याला त्याच्या आजोबा आणि काकांवर सोपवल्यामुळे आयुषला स्वतचे घर हे राहण्यासाठी असुरक्षित वाटायला लागले. “माझी आई माझा अभ्यास घेत नाही, मला समजून घेत नाही” हे त्याच्या डोक्यात पक्कं बसू लागलं आणि त्याचाच परिपाक म्हणजे आयुष हा अधिकाधिक रागीट आणि बंडखोरपणे वागू लागला. आयुषवर काम करण्यासोबतच नंदिनीवरही काम करणे ाढमप्राप्त होते. ‘’आयुषला स्वतची स्पेस दे” हे तिच्या मनात ठसवण्यापूर्वी “फक्त खाण्याच्या वेळा पाळल्या म्हणजे आईचं कर्तव्य पूर्ण होतं असं नाही” हे तिला पटवण्यात आलं. आयुषच्या रागावर नियंत्रण आणणे गरजेचेच होते. कारण तो दिवसेंदिवस वाढतच होता. अनावश्यक शिस्त, अभ्यासाचे अवडंबर न माजवता खेळीमेळीने करणे तसेच अभ्यासात काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यास त्याला मदत करणे हेही नंदिनीला सुचवण्यात आले.

आयुष बदलत होता हे खरे, पण तरीही एक लक्षात येत होतं की, अजूनही तो नंदिनीवर नाराज होता. तो आता सत्रांमध्ये तिच्याबरोबर यायचा, बोलायचाही, पण दोघांचं नातं म्हणावं तसं खुललेलं नव्हतं. याबद्दल त्याला छेडले असता तो म्हणाला, ‘’आई मला काही ओरडायचं असेल तर काकाला सांगते. मग काका मला ओरडतो आणि ही मग गप्प राहते.” नंदिनीने हे ऐकताच होकारात्मक मान हलवली.

बऱयाचदा पालक जेव्हा मुलं बदलण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांच्यावर अविश्वास दाखवतात तेव्हा मग अशी आयुष-नंदिनीसारखी गत होते. मुलांचा अशा वेळी “आपणही चांगले आहोत” हा विचार नाहीसा होऊन ती मूळ पदावर येण्याच्या शक्यता जास्त असतात. बंडखोरी, हट्टीपणा आणि कडकपणा या गोष्टी मग ओघानेच त्यांच्यात रुजायला लागतात. त्यातच इतरांच्या सांगण्यावरून किंवा इतरांच्या अनुभवावरून जर स्वतच्या मुलांना पाहिले गेल्यास त्यांचा ’स्व’ दुखावला जाऊ शकतो. ती अधिकाधिक बंडखोर अथवा हटवादी बनू शकतात. म्हणूनच ’प्रत्येक मूल हे वेगळेच असते. त्याला घडवण्यासाठी स्वतच्या जाणीव-नेणिवांना जागृत ठेवूनच वागायचे असते’ हा विचार पालकाने केला तर आयुष-नंदिनीसारख्या केसेस कधीही तयार होणार नाहीत.

प्रत्येक मूल हे स्व-प्रतिमा तयार करत असते. त्यात त्याला स्वतच्या आवडी-निवडी कळत असतात तसेच स्वतच्या वागण्या-बोलण्याच्या लकबीही समजून येत असतात. त्याला फक्त आई-बाबांच्या संमतीपूर्ण आधाराची आवश्यकता असते. तो आधार निश्चितच त्याचे आईवडील देऊ शकतात. मला वाटतं, मुलांची स्पेस जपणं, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य देणं, त्यांच्यासाठी मोकळं वातावरण तयार करणं हे सर्व सुजाण पालकत्व या प्रकारात मोडतं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
– [email protected]