धामोडच्या बाजारपेठेत 100च्या नकली नोटांचा सुळसुळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धामोड (ता. राधानगरी) येथे आज आठवडी बाजारात 100च्या नकली नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. धामोड हे आसपासच्या 40 वाडय़ा-वस्त्यांचे मुख्य केंद्र आहे. येथे मोठी व्यापारपेठ असून, एक सहकारी व एक राष्ट्रीयकृत बँक आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. शनिवारच्या आठवडी बाजारात तर ही उलाढाल अनेक लाखांवर जाऊन पोहचते.

बाजारपेठेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून शंभर रुपयांच्या बनावट नोटा आल्याचे काही व्यापाऱयांच्या निदर्शनास आले. गर्दीच्या वेळी प्रत्येक नोट तपासता येत नसल्याने काहीजण फसविले जात आहेत. खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली असते. अशा घाईगडबडीच्या काळात एजंटांमार्फत नोटा बाजारात पाठविल्या जातात. छोटी-छोटी दुकाने लक्ष्य केली जातात.

दुकानात खरेदीसाठी ग्राहक बनून नाममात्र खरेदी करायची. चलनातील बनावट नोट दुकानदाराला द्यायची. दुकानदार घाईगडबडीत ती नोट स्वतःकडे ठेवून उरलेली रक्कम ग्राहकाला देतो. अर्थात दिलेली रक्कमच तोतया ग्राहकांसाठी मिळकत ठरते. आज सकाळी येथील काही व्यावसायिकांच्या चलनामध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. चलनात नोटा असल्याची बातमी सर्वत्र पसरली. या प्रकारामुळे धामोड परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

धामोड भागात प्रथमच नकली नोटांच्या घटना

धामोड परिसरात नकली नोटांची घटना यापूर्वी घडल्या नसून, या बनावट नोटा चलनात कोणी व कशा आणल्या, याचा व त्या पाठीमागच्या मास्टरमाइंडचा पोलिसांनी छडा लावणे गरजेचे आहे. सध्याच्या अत्याधुनिक युगात उच्च प्रतीचे मल्टिपल युजेसचे कलर प्रिंटर सहज उपलब्ध होत आहेत. त्यात एकावेळी एक खरी नोट स्कॅन केल्यानंतर हुबेहुब नकली नोट प्रिंट होते. नंतर तंतोतंत ती कटरने कट केली जाते.