
हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांचे आज प्रचंड हाल झाले. सकाळपासून मेगाब्लॉक असल्याने आधीच पाच तास लोकल वाहतूक ठप्प होती. त्यानंतर मेगाब्लॉक संपत असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास मानखुर्द येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे पाच-सहा लोकल रद्द करण्याची नामुष्की रेल्वेवर ओढावल्याने सकाळपासून लोकल बंद असल्याने आधीच बेहाल झालेल्या प्रवाशांचे सायंकाळी आणखी प्रचंड हाल झाले.
मध्य रेल्वेने रुळांच्या देखभाल दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते सायंकाळी 4.10 या वेळेत कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेतल्याने दिवसभर लोकल सेवा ठप्प होती. मेगाब्लॉक संपल्याने लोकल वाहतूक सुरू होत असतानाच मानखुर्द स्थानकानजीक सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे हार्बरची लोकल सेवा जवळपास तासभर ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, वाशी या स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांनी ट्रकमधून चालत घर गाठले. रात्री उशिरापर्यंत याचा परिणाम जाणवला.

























































