कोल्हापुरातील नऊ बंधारे पाण्याखाली! 24 तासांत जिल्ह्यात 120 मि.मी. पावसाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राधानगरीसह जिह्यातील बहुतांशी सर्वच धरण पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. 24 तासांत पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत तब्बल तीन फूट वाढ झाली, तर सायंकाळी आणखी अर्ध्या फुटाची भर पडली. दुपारपर्यंत पंचगंगा नदीवरील सात, तर भोगावती नदीवरील दोन असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली गेले होते. गेल्या 24 तासांत जिह्यात एकूण 120 मि.मी. व सरासरी 11 मि.मी. पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर जिह्यातील राधानगरी, वारणा, दूधगंगा (काळम्मावाडी) आदी लहान-मोठय़ा अशा एकूण 15 व 91.81 टीएमसी क्षमतेच्या धरण प्रकल्पांत सध्या 28.88 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 1.56 टीएमसी क्षमतेचे घटप्रभा मध्यम प्रकल्प धरण 100 टक्के भरले असून, आज दुसऱया दिवशीही या धरणांतून दोन हजार 72 क्युसेक विसर्ग सुरू होता. कोदे हा लघुप्रकल्प 93 टक्के भरला आहे. याशिवाय राधानगरीसह इतर धरणे 25 ते 60 टक्के भरली आहेत. राधानगरी धरणातूनही 700 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

शहरात सध्या पावसाची उघडझाप सुरू असली, तरी ग्रामीण भागासह धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा चांगलाच जोर दिसून येत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगाच्या पातळीत तब्बल तीन फुटांची वाढ झाली. सकाळी सातच्या सुमारास 20 फूट 11 इंच असलेली पाणीपातळी दुपारी 12च्या सुमारास 21 फूट दोन इंच झाली होती, तर सायंकाळी सहाच्या सुमारास 21 फूट सहा इंच झाली होती. दुपारपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ यांसह सात, तर भोगावती नदीवरील हळदी व सरकारी कोगे असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक अन्य मार्गाने सुरू होती. राधानगरी धरणाची पाणीसाठा क्षमता 8.361 टीएमसी आहे. सध्या 3.14 टीएमसी म्हणजेच 37.61 टक्के पाणीसाठा झाला आहे.