
राजकारणात कुठे आणि कधी थांबायचं हे ज्याचे त्याला कळले पाहिजे. माझा पुतण्या ज्यावेळेस मला म्हणेल की, राजकारण सोडून आता तुम्ही घरी बसा त्यावेळेस मी नक्की त्याचे ऐकेन, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी असे वक्तव्य केले.
आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार किंवा अजित पवार यांच्याबरोबर न जाता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी भेट देवून माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी भुजबळ म्हणाले, शरद पवार यांचे अतिशय जवळ असलेले विश्वासू सहकारी तसेच तुमचा पुतण्या अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल हे नेते आज का दुरावले. त्यांनी साथ का सोडली याचा विचार करावा.
शरद पवार यांची भूमिका तळ्यात–मळ्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आम्ही गेले अनेक वर्षे काम केले असून, गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याने अजित पवार यांनी मळ्यात राहण्याचा विचार केला व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झालो, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी मंचर येथे केले.

































































