
भाजपकडून राज्यात आणि देशात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाबाबत जनतेतून रोष व्यक्त होत आहे. जनताही आता या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनीही टीका केली असून या फोडीफोडीच्या राजकारणाने भाजपने नेमके काय साधले, असा सवाल भाजपला केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकाधिक आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मलाच नव्हे तर, अनेक आमदारांना अजित पवार गटाकडून संपर्क साधला गेला होता. मात्र, आपण शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. भाजपने मला वसुली घोटाळय़ाच्या बनावट आरोपाखाली अडकवले, मला तुरुंगात जावे लागले, पण न्यायालयासमोर आरोप करणारेच उघडे पडले, खोटे आरोप केल्याची कबुली त्यांना द्यावी लागली. त्यामुळे माझी न्यायालयाने सुटका केली, भाजपने तंपासयंत्रणांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले असे देशमुख म्हणाले.
राज्यातील भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा खुला तमाशा जनता पाहात आहे. आधी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. तरीही राज्यातील भाजपची स्थिती सुधारली नाही. राज्यातील सरकारला स्थैर्य आले नाही. मग, अजित पवारांसह काही आमदारांना फोडले. इतके करूनही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल याची खात्री नाही. तर, हे फोडाफोडीचे राजकारण करून भाजपच्या हाती काय लागले, असा सवाल देशमुख यांनी केला. जनतेच्या मनातून भाजप उतरला असून लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा जनतेला उबग आला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.



























































