एकदम सॉसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>रश्मी वारंग

मुख्य पदार्थाला केवळ सोबत करण्यासाठी म्हणून तयार झालेला आणि घराघरांत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणारे पदार्थ म्हणजे टोमॅटो सॉस आणि केचअप. टोमॅटोंच्या वाढलेल्या किमतीमुळे चर्चेत आलेली ही त्यांची गोष्ट.

आपल्या लोकांना सॉस आणि केचअप सख्खे भाऊ वाटले तरी त्यांच्यात फरक आहे. केचअपमध्ये मसाले, व्हिनेगर आवश्यक असतात, तर सॉसमध्ये ते जवळपास वापरले जात नाही. शेफच्या दृष्टीने विचार केला तर केचअप हा पदार्थावरील ड्रेसिंगचा, सजावटीचा प्रकार आहे आणि सॉस हा पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी उपयोगाला येतो.

सॉस म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर लालमलाल टोमॅटो सॉसच येतो. मात्र टोमॅटो घरीदारी रुजण्यापूर्वीही सॉस आणि केचअप अस्तित्वात होते. विशिष्ट मोसमात मिळणारे पदार्थ वर्षभर मिळण्यासाठी साठवून ठेवले जात.

सॉस म्हणजे टोमॅटो सॉस असे एकेकाळी समीकरण होते. या सॉसमध्ये टोमॅटोची एंट्री नाटय़पूर्ण म्हणता येईल. आजच्या इतके त्याकाळी टोमॅटोचे प्रस्थ नव्हते. आज सगळय़ांच्या तोंडचे पाणी पळवणारा टोमॅटो 18 व्या शतकापर्यंत फक्त टेबलसजावटीसाठी वापरली जाणारी फळभाजी म्हणून माहीत होता. कारण टोमॅटो विषारी असतात असा अपप्रचार त्याकाळी झाला होता. टोमॅटोचा उल्लेख काही ठिकाणी ‘पॉयझनस ऍपल’ असा केला गेलेला दिसतो, पण कालांतराने हा गैरसमज दूर झाला. तरीही टोमॅटो हा गरीबांचा आहार होता. त्याच्या विषारीपणाच्या अफवेमुळे श्रीमंत मंडळी टोमॅटोपासून चार हात अंतर राखून असायची. गरीब शेतकऱयांनी स्वस्त किंबहुना, फुकट मिळणारी भाजी म्हणून टोमॅटो खायला सुरुवात केली. टोमॅटो विषारी नाही हे त्यांच्या लक्षात आले, पण त्याकाळी टोमॅटो वर्षभर नाही तर विशिष्ट मोसमात पिकवले जात. त्यामुळे इतर पदार्थांसारखेच टोमॅटोला वर्षभर जतन करण्यासाठी शेतकरी कुटुंबातून टोमॅटो सॉस किंवा केचअप बनवला जाऊ लागला. एखाद मोसमात उदंड पीक आल्याने हा सॉस त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध केला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सॉस, केचअप विक्रीसाठी उपलब्ध झाले. 1812 मध्ये टोमॅटो केचअपची अधिकृत पाककृती जाहीर करण्यात आली. जसजसा फास्ट फूडचा वापर वाढत गेला तसतसा टोमॅटो सॉस, केचअप यांचा खपही वाढला. त्यांचा खाण्यासाठी होणारा वापर जितका लोकप्रिय आहे तितकाच धातूच्या वस्तू लख्ख करणारा क्लिंजर म्हणूनही त्यांचे महत्त्व खास आहे. आंबट, गोड, खारट आणि तुरट चवीचे सॉस, केचअप पिझ्झा ते समोसा कोणत्याही पदार्थाला चवदार करतात, पण कॅनडामध्ये चक्क केचअप केक बनवला जातो.

सॉस किंवा केचअप म्हणजे हिंदुस्थानी चटण्यांसारखे जेवणातील आजूबाजूचे पदार्थ. त्यांची भूमिका सहायकाची. भजी व समोसे यांचा कोरडेपणा पळवणे, पिझ्झा व सॅण्डविचला आधार देणे ही कामे करता करता फास्ट फूडच्या जमान्यात हा साइड हीरो भाव खाऊन जातो.

असा झाला प्रवास

चीनमध्ये खारवलेले मासे आणि मसाले यांचे मिश्रण बनवले जाई. त्याला ‘कोई-चिआप’ म्हणत. चीनकडून मलेशिया, इंडोनेशिया या प्रांतांमध्ये हा पदार्थ गेला तेव्हा त्याला ‘काय-
चॅप’ असे नाव दिले गेले. ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या देशातला हा पदार्थ इंग्रजी कुककडून अमेरिकन कॉलनीजमध्ये पोहोचला आणि त्याचा उच्चार ‘केचअप’ असा होऊ लागला. त्याकाळात विविध मासे, कालवे यांचे केचअप बनवले जाई. सॉस हा शब्द लॅटिन ‘साल्सा’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. या शब्दाचा
सॉल्ट अर्थात मिठाशी जवळचा संबंध आहे. मिठात खारवलेले म्हणजे सॉसी.