अजितदादांची सोबत मान्य करून घ्या, मुख्यमंत्री शिंदेचे डॅमेज कंट्रोल सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार सोबत आल्याने शिवसेनेशी गद्दारी करून सत्तेत आलेल्या मिंधे गटाचा बुरखा आता फाटलाय. त्यातच राष्ट्रवादीचा फुटीर गट सत्तेत आल्याने गेले वर्षभर मंत्रिपदाच्या आशेवर असलेल्या मिंध्यांची अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीसोबत हे पचवायला जड जातय ना? पण ही युती मान्य करून घ्या. आपल्याला पंतप्रधान मोदींचे हात बळकट करायचे आहेत, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आज मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात अजितदादांना सोबत घेण्यामागची कारणे शिंदे यांनी सांगितली. ते म्हणाले, राजकारणात काही तडजोडी आणि बेरजेची गणिते करावी लागतात. हा त्याचाच एक भाग आहे असे समजा, असा सल्ला शिंदे यांनी आपल्या समर्थकांना दिला.

जुळवून घेण्याचा सल्ला
अजित पवारांवर निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप करत शिवसेनेशी गद्दारी करत 40 आमदार मिंधे गटात सहभागी झाले होते. आता पुन्हा अर्थखाते त्यांच्याकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मिंधे गटातील बहुतांश आमदार हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आले आहेत. यामुळे अजितदादा पिंवा त्यांच्या गटाला टोकाचा विरोध केल्यास आगामी निवडणुकांत त्याचा फटका बसण्याची धास्ती मिंध्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या समर्थकांना दिला आहे.