
शेअर बाजार गुरुवारी तेजीसह बंद झाला. बाजार भांडवल तब्बल 301 लाख कोटींवर पोहोचल्याने एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 164.99 अंकांच्या म्हणजेच 0.25 टक्क्यांच्या उसळीसह 65,558.89 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजात शेअर बाजाराने 66 हजारांचा टप्पाही ओलांडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 29.45 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 19,413.75 वर बंद झाला. निफ्टीत टीसीएसचे शेअर्स 2.60 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
मुंबई शेअर बाजारात टीसीएसच्या शेअर्समध्ये 2.47 टक्क्यांनी वाढ झाली. इन्फोसिसचे शेअर्स 2.40 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि ऑक्सिस बँकेचे शेअर्स प्रत्येकी एक टक्कावाढीसह बंद झाले.
रुपया 17 पैशांनी मजबूत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन तो 82.07 वर पोहोचला. गेल्या सत्रात तो 82.24 च्या पातळीवर बंद झाला होता.
यांचे शेअर्स घसरले
पॉवरग्रीडच्या शेअरमध्ये सर्वाधिक 3.35 टक्क्यांची घसरण दिसली. याशिवाय मारुती, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचयूएल, नेस्ले इंडिया, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, टायटन, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा आणि एचसीएल टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
























































