कचरा वेचकांच्या जगण्याला ‘आकार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>अनघा सावंत

‘‘चला, कचऱ्याला देऊ या आकार’’ म्हणत सफाई कामगार आणि कचरावेचक जनसमूहाच्या जीवनमानाला सुयोग्य आकार देणारी आणि त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा यासाठी सातत्याने झटणारी संस्था म्हणजे ‘आकार मुंबई.’

‘आकार मुंबई’ ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी  स्वयंसेवी संस्था असून गेल्या 27 वर्षांपासून मुंबईतील बेघर, सफाई कामगार तसेच कचरा वेचक जनसमूहासोबत वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरांत कार्यरत आहे.

2 सप्टेंबर 1997 रोजी दिवंगत मिलिंद शंकर आरोंदेकर यांनी  कचरा वेचक, बेघर, सफाई कामगारांच्या उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केली. आतापर्यंत ‘आकार मुंबई’ने 78 स्वयंसहाय्यता गट उभारले असून 1030 महिला कचरा वेचकांना स्वयंसहाय्यता गटाद्वारे जागरूक केले आहे. पश्चिम उपनगरांतील वांद्रे ते दहिसर या क्षेत्रात हे स्वयंसहाय्यता गट अस्तित्वात आहेत.

संस्थेने कचरा वेचकांना शिधापत्रिका, जन धन खाते, मतदान यादी कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी जीवनावश्यक कागदपत्रे पूर्ण करून दिली आहेत. तसेच कचरा वेचकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आणि आरोग्य शिबिरेही संस्था आयोजित करते.

संस्थेतर्फे वांद्रे ते दहिसर या मुंबईच्या पश्चिम उपनगरांत 3200 कचरा वेचकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला सादर करण्यात आला. त्यानंतर कचरा वेचकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ओळखपत्र देण्याची मंजुरी मिळाली. याशिवाय 2200 कचरा वेचकांना अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ मिळाला. सध्या पाच वॉर्डमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आठ सुका कचरा वर्गीकरण केंद्रे चालविण्यात येत आहे.

संस्थापक मिलिंद आरोंदेकर यांच्या पश्चात ‘आकार मुंबई’ संस्थेचा संपूर्ण कारभार त्यांची कन्या जिज्ञासा सोहन मोरे-आरोंदेकर या सांभाळत असून ‘वर्ण, वर्ग, लिंग यावर भेदाभेद न होता जीवनाची महत्ता प्राप्त करून आयुष्य जगणारा नागरिक घडवणे’ हे संस्थेचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.  कचरा वेचकांचे नेते स्वतःच कचरा वेचकांच्या गरजा आणि प्रश्नांवर पुढाकार घेऊन महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील हा संस्थेचा मानस आहे.

  • गेल्या अनेक वर्षांपासून संस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या सहकार्याने कचरा वेचक जनसमूह तसेच नागरिकांसमवेत सुका कचरा आणि ओला कचरा यासंदर्भात जनजागृतीचे कार्य करीत आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सोबत संस्थेचे संयुक्तपणे कामकाज चालू आहे.