
पावसाने दडी मारल्याने आणि जोरदार वाऱयामुळे जमिनीतील ओलही सुकू लागल्याने जिह्यात खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. लागवडीखालील क्षेत्रापैकी 5 लाख 79 हजार 768 पैकी फक्त 1 लाख हजार 44 हेटर क्षेत्रावर (36 टक्के) पेरण्या झाल्या आहेत.
पावसाअभावी जिल्ह्याच्या कपाशीच्या क्षेत्रात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला तरच तूर, मका, बाजरी, कपाशी आदी पिके घेता येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तसेच वेळेनंतर सोयाबिन पिकाची पेरणी केली तरी हरकत नाही. मात्र, त्याचा रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विद्यमान परिस्थितीत जिह्यात खरीप हंगामाची स्थिती बिकट आहे.
जिह्यात आत्तापर्यंत कपाशीच्या 1 लाख 14 हजार 342 पैकी 17 हजार 936 हेक्टरवर (16 टक्के) क्षेत्रात लागवड झालेली आहे. तर सोयाबीनची 54 हजार 294 पैकी 26 हजार हेक्टर (47.80 टक्के), सूर्यफुलाच्या 534 पैकी 12 हेक्टर (2.25 टक्के), बाजरीच्या 1 लाख 40 हजार 812 पैकी 20 हजार 176 हेक्टर (14.33 टक्के), कडधान्यांच्या 78 हजार 256 पैकी 42 हजार 268 हेक्टर (54 टक्के), उडीद 17 हजार 596 पैकी 6 हजार 842 हेक्टर (38.88 टक्के), मूग 40 हजार 378 पैकी 13 हजार 657 हेक्टर (33.82 टक्के), तुरी 15 हजार 121 पैकी 21 हजार 769 हेक्टर (143.97 टक्के) आणि मका 32 हजार 570 पैकी 13 हजार 976 (32.91 टक्के) हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. जिह्यात आत्तापर्यंत 43.4 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
जून महिन्यात सरासरी 108 मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा 55.6 मिमी म्हणजे सरासरीच्या निम्म्याच पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात सरासरी 139.7 मिमी पाऊस पडतो. मात्र, अद्यापि पुरेसा पाऊस झालेला नाही. परिणामी शेतकऱयांची चिंता वाढलेली आहे. राज्यात यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे सुरुवातीलाच पेरण्या रखडल्या असताना त्यात पुन्हा सध्याही पावसाने ओढ दिली आहे.
परिणामी आता खरिपाच्या पेरण्या करता येणार की नाही, असा प्रश्न पडला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱयांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पाऊस लांबल्याने आता खरिपात कोणते पीक घेणे योग्य राहील, याबद्दल कृषी विभागाकडून माहिती दिली जात आहे. मूग व उडदाची पेरणी आता अशक्य आहे. कपाशीचे क्षेत्रही घटण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जाते.






























































